अमेरिकेच्या सोफिया केनिनने अंतिम फेरीत स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाचा ४-६, ६-२, ६-२ ने पराभव करत आपलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. तब्बल दोन तास चाललेल्या या अंतिम सामन्यात २१ वर्षीय केनिनने गार्बिनची झुंज मोडून काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

गार्बिनने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात करत आघाडी घेतली होती. मात्र नंतरच्या दोन सेटमध्ये केविनने गार्बिनला सडेतोड उत्तर दिलं. अंतिम सामन्यात आणखी एक आगळावेगळा योगायोग जुळून आला आहे.

२१ वर्षीय सोफिया सध्या अमेरिकेचं प्रतिनिधीत्व करत असली तरीही ती मूळची रशियाची आहे. मॉस्को शहरात तिचा जन्म झाला होता. तर दुसरीकडे स्पेनची गार्बिन ही देखील जन्माने व्हेनेझुएलाची आहे. या सामन्याने १९९७ साली खेळवण्यात आलेल्या मार्टिना हिंगीस विरुद्ध मेरीय पियर्स या सामन्याची आठवण टेनिस प्रेमींना झाली. मार्टीना हिंगीसचा जन्म स्लोव्हाकियात झाला होता पण तिने स्वित्झर्लंडचं प्रतिनिधीत्व केलं. मेरी पियर्सचा जन्म कॅनडातला होता मात्र तिने फ्रान्सचं प्रतिनीधीत्व केलं.