वृत्तसंस्था, मेलबर्न

टेनिसचे भविष्य म्हणून पाहिले जाणाऱ्या कार्लोस अल्कराझला कामगिरीत सातत्य राखण्यात पुन्हा अपयश आले. गतवर्षी विल्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या अल्कराझला यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्याला अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. दुसऱ्या मानांकित अल्कराझला सहाव्या मानांकित जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवने पराभवाचा धक्का दिला. 

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झ्वेरेव्हने ग्रँडस्लॅम कारकीर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये असलेल्या खेळाडूला नमवण्यात यश मिळवले. झ्वेरेव्हने अल्कराझचा ६-१, ६-३, ६-७ (२-७), ६-४ असा पराभव केला. या सामन्यातील पहिले दोन सेट झ्वेरेव्हने सहज जिंकले. तिसऱ्या सेटमध्येही झ्वेरेव्ह ५-२ असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर अल्कराझने पुनरागमन केले. त्याने झ्वेरेव्हची सव्‍‌र्हिस दोन वेळा तोडली आणि सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकरमध्ये अल्कराझला ७-२ असा विजय मिळवण्यात यश आले. चौथ्या सेटमध्ये मात्र अल्कराझ सर्वोत्तम खेळ करण्यात पुन्हा अपयशी ठरला. याचा फायदा घेत झ्वेरेव्हने सेटमध्ये बाजी मारत कारकीर्दीत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या फेरीत त्याच्यासमोर तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचे आव्हान असेल.

मेदवेदेवने उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित पोलंडच्या हर्बट हुरकाझला पाच सेट रंगलेल्या लढतीत ७-६ (७-४), २-६,६-३, ५-७, ६-४ असे पराभूत केले. मेदवेदेवने गेल्या दोनही वर्षांमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही मेदवेदेवचे पारडे जड मानले जात आहे. उपांत्य फेरीची दुसरी लढत अग्रमानांकित नोव्हाक जोकोविच आणि चौथ्या मानांकित यानिक सिन्नेरमध्ये होईल.

महिलांमध्ये झेंग, यास्त्रेमस्काची आगेकूच

चीनच्या क्विनवेन झेंगने अ‍ॅना कालिन्स्कायाचा पराभव करत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.

१२व्या मानांकित झेंगने ही लढत ६-७ (४-७), ६-३, ६-१ अशा फरकाने जिंकली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या दयाना यास्त्रेमस्काने चेक प्रजासत्ताकच्या लिन्डा नोस्कोवाला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.