scorecardresearch

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: नदाल, त्सित्सिपासचे संघर्षपूर्ण विजय

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत नदालला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने तीन तास झुंजवले.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: नदाल, त्सित्सिपासचे संघर्षपूर्ण विजय

पुरुषांमध्ये मेदवेदेव, तर महिलांमध्ये श्वीऑनटेकची आगेकूच

वृत्तसंस्था, मेलबर्न
रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स या प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर होणाऱ्या हंगामातील पहिल्याच ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सोमवारी स्पेनच्या अग्रमानांकित राफेल नदाल आणि ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्या फेरीत विजयासाठी झगडावे लागले. त्याच वेळी महिला विभागात अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक, जेसिका पेगुला, कोको गॉफ यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत नदालला ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने तीन तास झुंजवले. मात्र, नदालने चार सेटपर्यंत रंगलेली लढत ७-५, ३-६, ६-४, ६-१ अशी जिंकली. नव्या हंगामातील नदालचा हा पहिला विजय ठरला.ग्रीसच्या त्सित्सिपासने स्पर्धेची विजयी सुरुवात करताना फ्रान्सच्या क्विन्टिन हॅलिसचा ६-३, ६-४, ७-६ (८-६) असा पराभव केला. तसेच सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणाऱ्या सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवने मार्कोस गिरोनला ६-०, ६-१, ६-२ असे सहज नमवले. सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेने चुरशीच्या लढतीत कॅनडाच्याच वासेक पोस्पिसिलवर १-६, ७-६ (७-४), ७-६ (७-३), ६-३ अशी मात केली.

महिला विभागात अग्रमानांकित श्वीऑनटेकला पहिल्या विजयासाठी झगडावे लागले. मात्र, दोन्ही सेटमध्ये मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत श्वीऑनटेकने जर्मनीच्या ज्युली नेमायरचे आव्हान ६-४, ७-५ असे परतवून लावले. ही लढत १ तास ५९ मिनिटे चालली. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाने जॅकलिन क्रिस्टियनला ६-०, ६-१ असे नमवले. सातव्या मानांकित गॉफने कॅटरिना सिनियाकोव्हाचा ६-१, ६-४ असा पराभव केला.गतवर्षी उपविजेती ठरलेल्या डॅनिएल कॉलिन्सलाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. तेराव्या मानांकित कॉलिन्सने अॅना कालिस्कायाचा ७-५, ५-७, ६-४ असा पराभव केला. पहिल्या फेरीच्या निकालानंतर महिला विभागात जेसिका आणि गॉफ उपांत्य फेरीत समोरासमोर येऊ शकतात. त्याच वेळी कॉलिन्ससमोर श्वीऑनटेकचे आव्हान उभे राहू शकते. कोकोचा सामना अमेरिकन स्पर्धेची माजी विजेती एमा रॅडूकानूशी होऊ शकेल. रॅडूकानूने पहिल्या फेरीत जर्मनीच्या तमारा कोरपैशचा ६-३, ६-२ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 00:38 IST

संबंधित बातम्या