वृत्तसंस्था, मेलबर्न

चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या या वर्षांच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे २४ ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच व युवा स्पेनच्या कार्लोस अल्कराझ यांमध्ये पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जोकोविचला युनायटेड चषक स्पर्धेत सर्बियाकडून खेळताना मनगटाला दुखापत झाली होती. मात्र, आपण ठीक असल्याचे जोकोविचने सांगितले. उपांत्यपूर्व सामन्यात मनगटाला दुखापत झाल्याने त्याला सामन्यादरम्यान दोनदा वैद्यकीय मदत घ्यावी लागली व त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डि मिनाऊरकडून पराभूत व्हावे लागले होते.

‘‘मी तंदुरुस्त आहे. डी मिनाऊरच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या सामन्याआधी मला पुरेसा वेळ मिळाला. मी चांगला सरावही केला. सराव करताना मला कोणताही त्रास जाणवला नाही,’’ असे जोकोविचने सांगितले. मेलबर्न पार्कमध्ये जोकोविचने गेले २८ सामने विजयी लय कायम राखली आहे. त्याने १० ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. जोकोविच पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या डिनो प्रिजमिचचा सामना करेल. जोकोविचने आपली आगेकूच कायम राखल्यास स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत अँडी मरे आणि उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासची गाठ पडू शकते. पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ व जर्मनीचा सहावा मानांकित अ‍ॅलेक्झांदर झ्वेरेव्ह यांच्यात उपांत्यपूर्व सामना होऊ शकेल.

हेही वाचा >>>IND vs ENG : मुंबई इंडियन्सने पोस्टरमधून रोहित शर्माला वगळल्याने चाहते संतापले; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला एकेरीतील माजी विजेता नाओमी ओसाकाचा सामना पहिल्या फेरीत १६व्या मानांकित कॅरोलिना गार्सियाशी होईल. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती अमेरिकेची कोको गॉफही याच गटात आहे. तीन ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणाऱ्या कर्बरचा सामना डॅनिएले कॉलिन्सशी होईल. कॉलिन्सने २०२२मध्ये श्वीऑटेकला उपांत्य फेरीत नमवले होते. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत अग्रमानांकित इगा श्वीऑटेकचा सामना २०२०ची विजेता सोफिया केनिनशी होणार आहे. तर, अरिना सबालेन्का एला सिडेलचा सामना करेल.