IND vs BAN Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताच्या पहिल्याच सामन्यात अक्षर पटेल मोठी ऐतिहासिक कामगिरी करण्यापासून एक पाऊल दूर होता. पण रोहित शर्माच्या एका चुकीमुळे अक्षर पटेलची कामगिरी अधुरी राहिली. बांगलादेशच्या धावांवर अंकुश ठेवत भारताने झटपट विकेट घेतल्या. यादरम्यान अक्षर पटेलने सलग दोन विकेट्स घेतले. पण यादरम्यान रोहित शर्मामुळे अक्षरची हॅटट्रिक हुकली. बांगलादेशच्या डावानंतर अक्षर पटेलने यावर वक्तव्य केलं आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, रोहितने त्याच्या चेंडूवर झेल सोडल्यामुळे अक्षर पटेलची हॅटट्रिक चुकली. आता यानंतर अक्षरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अक्षरने नवव्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन विकेट घेतल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर स्लिपमध्ये रोहितला रोहितने झेल टिपण्याची संधी होती. पण रोहित झेल पकडू शकला नाही. यानंतर रोहित खूपच निराश दिसत होता.

बांगलादेशच्या डावानंतर अक्षरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला आणि रोहितने झेल सोडल्यानंतर त्याला काय वाटत होतं याबद्द त्याने सांगितले. अक्षर म्हणाला, “मी तर सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, पण नंतर रोहितने कॅच सोडल्याचं मी पाहिले. यावर काय करू शकतो. सर्वांबरोबरच असं होतं. त्याने झेल सोडल्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, मी फक्त वळलो आणि पुढे निघून गेलो. हा खेळाचा एक भाग आहे.”

अक्षरने तन्जीदला बाद करत पहिली विकेट मिळवली होती, पण विकेट असूनही त्याने अपील केलं नाही. केएल राहुलचं अपील पाहून त्याने पंचांकडे अपील केलं आणि नंतर पंचांनी बाद असल्याचा इशारा केला. याबाबत अक्षर म्हणाला, “त्या दरम्यान खूप काही घडलं. तो आऊट झाल्याचं मला माहीत नव्हतं, पण केएलने अपील केलं आणि तो बाद झाला होता. यानंतर मला दुसरी विकेट मिळाली. जेव्हा तिसऱ्या चेंडूवर बॅटची कड लागली तेव्हा मला वाटलं होतं की मला विकेट मिळाली. हे एक अतिशय रोमांचक षटक होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशने अवघ्या ३५ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर हा संघ १०० धावा करेल यातही शंका होती. मात्र, जाकीर अली आणि तौहित ह्रदय यांनी डावाची धुरा सांभाळत सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने २२८ धावा केल्या. तौहीदने ११८ चेंडूत १०० धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. तर जाकीर अलीने ११४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली.