मराठमोळ्या आयुष म्हात्रेची बॅट इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा तळपली आहे. आयुष म्हात्रेने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या युथ टेस्टमध्ये वादळी शतक झळकावलं आहे. आयुष म्हात्रे युषथ वनडे सामन्यात अपयशी ठरला, पण आयुषने आता दोन्ही युथ टेस्ट सामन्यांमध्ये शतकं झळकावली आहेत.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार खेळी करत शतक झळकावलं आहे. पहिल्या डावात आयुष ॉ८० धावा करत बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं होतं. पण दुसऱ्या डावात कोणतीही चूक न करता त्याने शतक पूर्ण केलं आणि वादळी अंदाजात फटकेबाजी केली.
मुंबईकर फलंदाज आयुष म्हात्रेने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली आणि २५ चेंडूत झटपट अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, त्याने दुसऱ्या डावात ६४ चेंडूत शतकी कामगिरी केली. यारम्यान त्याने १२ चौकार आणि ४ षटकार लगावले. कसोटी सामन्यात टी-२० अंदाजात फटकेबाजी करत संघाला झटपट धावा करून दिल्या.
आयुष म्हात्रे शतकानंतर ८० चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांसह १५७.५० च्या स्ट्राईक रेटने १२६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी ३५५ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि आयुषची जोडी उतरली. परंतु वैभवला खातेही उघडता आले नाही आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
दुसऱ्या डावात भारताने एकही धाव न काढता पहिली विकेट गमावली. त्यानंतर विहान मल्होत्रा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ४० चेंडूत २७ धावा केल्या आणि बाद झाला. दुसऱ्या डावात विहान आणि आयुष यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावांची दमदार भागीदारी रचली. आता भारताला विजयासाठी ६५ धावांची गरज असताना खराब सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आहे.