बेशिस्त वर्तनाबद्दल बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब उल हसन याच्यावर बांगलादेश क्रिकेट मंडळाने सहा महिने बंदीची कारवाई केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याला भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शकीबला आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सराव शिबिरात भाग घेण्याबाबत बांगलादेश संघाचे प्रशिक्षक चंडिका हाथरुसिंघे यांनी कळविले होते, मात्र सराव शिबिरात भाग न घेता तो बार्बाडोस येथील कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाला. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याने मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्रही घेतलेले नाही. सराव शिबिरात सहभागी होण्यास सांगितल्याबद्दल त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची धमकीही दिली होती, मात्र बांगलादेश मंडळाने त्याच्या या धमकीला दाद न देता त्याच्यावर बंदीची कारवाई केली.