भारत दौऱ्यात दोन्ही कसोटीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या वेस्ट इंडिजला बांगलादेश दौऱ्यातील पहिल्या वनडे सामन्यातही पराभवाचा दणका बसला. विजयासाठी २०८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची स्थिती ७९/१ अशी होती. मात्र त्यानंतर रिषाद हुसेनच्या फिरकीसमोर वेस्ट इंडिजने लोटांगण पत्करलं आणि त्यांचा डाव १३३ धावांतच आटोपला. बांगलादेशने ७४ धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला होता. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या बॅट्समनलाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. तौहिद हृदॉयने ५१ धावांची संयमी खेळी केली. महिदुल इस्लाम अकोनने ४६ तर नझमुल हसन शंटोने ३२ धावा करत तौहिदला चांगली साथ दिली. रिषादने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावांची खेळी केली. बांगलादेशचा डाव २०७ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजतर्फे जयडेन सील्सने ३ तर रॉस्टन चेस आणि जस्टीन ग्रीव्ह्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युतरादाखल खेळताना ब्रँडन किंग आणि अलिक अथेन्झ यांनी ५१ धावांची खणखणीत सलामी दिली. रिषादने अथेन्झला बाद करत ही जोडी फोडली. त्याने २७ धावा केल्या. केसी कार्टीने किंगला साथ दिली. वेस्ट इंडिजचा संघ ७९/१ असा सुस्थितीत होता. रिषादने कार्टीला बाद केलं. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कार्टीला रिषादनेच तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ६० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध शेरफन रुदरफोर्डलाही रिषादने त्याच षटकात बाद केलं. पुढच्या षटकात रिषादने भरवशाच्या रॉस्टन चेसला माघारी धाडलं. चेसने ६ धावा केल्या. गुदकेश मोटीने प्रतिकार केला पण मेहदी हसन मिराझने गुदकेशला एलबीडब्ल्यू बाद केलं. तन्वीर इस्लामने शे होपला बाद करत वेस्ट इंडिजच्या आशा संपुष्टात आणल्या. होपला ३२ चेंडूत १५ धावाच करता आल्या. तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध रोमारिओ शेफर्ड केवळ एक धाव करून तंबूत परतला. मुस्ताफिझूरने त्याला बाद केलं. मुस्ताफिझूरनेच जस्टीन ग्रीव्ह्जलाही माघारी पाठवलं. रिषादने जयडेनला बाद करत बांगालादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रिषादने ९ षटकात ३५ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडारच पाडलं.

२६ धावांची उपयुक्त खेळी आणि ६ विकेट्स पटकावणाऱ्या रिषादलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. बांगलादेशसाठी वनडेत एका डावात ६ विकेट्स पटकावणारा रिषाद केवळ चौथा खेळाडू आहे. याआधी मश्रफी मुर्तझा, रुबेन हुसेन, मुस्ताफिझूर रहमान यांनी डावात ६ विकेट्स पटकावण्याची किमया केली होती.