ढाका : उत्पन्न आणि लाभ यासंदर्भात क्रिकेट मंडळाकडून योग्य आश्वासन मिळाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे आगामी भारत दौऱ्यावरील मळभ दूर झाले आहे.

बुधवारी मध्यरात्री क्रिकेटपटू आणि बांगलादेश क्रिकेट मंडळ यांच्यात दोन तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. या बैठकीला शाकिबसह मुशफिकर रहिम, महमदुल्ला आणि तमिम इक्बाल हे वरिष्ठ खेळाडू हजर होते. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सोमवारी केलेल्या ११ मागण्यांमध्ये बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या नफ्यातील वाटा आणि महिला क्रिकेटपटूंना समान उत्पन्न या दोन मागण्यांचा समावेश करण्यात आला. खेळाडूंच्या संघटनेची नव्याने निवडणूक घेण्याची मागणीसुद्धा संघटनेने मान्य केली आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख नझमूल हसन यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. आमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही ‘नॅशनल क्रिकेट लीग’ खेळण्याचा आणि सराव सत्रात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

-शाकिब अल हसन