एएफपी, माद्रिद

दडपणाखाली खेळ कसा उंचवावा, याचा उत्तम नमुना बार्सिलोनाचे नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसी व लुइस सुआरेझ यांनी बुधवारी पेश केला. ला लिगा फुटबॉलमधील व्हिलारेयालविरुद्धच्या लढतीत २-४ अशा पिछाडीवर असतानाही अखेरच्या पाच मिनिटांत दोन गोल केल्यामुळे बार्सिलोनाने ४-४ अशी बरोबरी साधून गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले.

फिलिप कुटिन्होने १२व्या मिनिटाला बार्सिलोनासाठी पहिला गोल केला, तर पुढील चारच मिनिटांत (१६) माल्कमने संघासाठी दुसरा गोल झळकावला. त्यानंतर मात्र व्हिलारेयालच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन केले. २३व्या मिनिटाला सॅम्युएल शुकवेझने पहिला, तर ५०व्या मिनिटाला टोको एकाम्बीने व्हिलारेयालसाठी दुसरा गोल करत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

मध्यंतरानंतर व्हिन्सेंट एबोरा (६२) व कालरेस बाका (८०) यांनी आणखी गोल झळकावून व्हिलारेयालची आघाडी ४-२ अशी केली. अखेरच्या १० मिनिटांत दोन गोल करणे बार्सिलोनाला कठीण जाणार असे वाटत असतानाच मेसीने ९०व्या मिनिटाला फ्री किकद्वारे संघासाठी तिसरा, तर भरपाई वेळेत (९३) सुआरेझने डाव्या कोपऱ्यातून बार्सिलोनासाठी चौथा गोल नोंदवून अखेरच्या क्षणी सामना ४-४ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

युव्हेंटसच्या विजयात लिओनाडरे, कीनचे योगदान

सेरी ए फुटबॉल स्पर्धा

मिलान : उदयोन्मुख खेळाडू मॉइस कीन व लिओनाडरे बोनुसी यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर युव्हेंटसने सेरी ए फुटबॉल स्पर्धेत कॅगलिआरी संघावर २-० अशी मात केली.लिओनाडरेने २२व्या मिनिटाला पहिला गोल झळकावत युव्हेंटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १९ वर्षीय कीनने सामन्याच्या ८५व्या मिनिटाला संघासाठी दुसरा व यंदाच्या हंगामातील चौथा गोल नोंदवून युव्हेंटसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.