बर्लिन : आक्रमकपटू लुइस डियाझने पदार्पणात साकारलेल्या गोलमुळे बलाढ्य बायर्न म्युनिक संघाने स्टुटगार्टवर २-१ अशी मात करत जर्मन सुपर चषकाचे जेतेपद पटकावले. बायर्नचा अन्य गोल तारांकित आघाडीपटू हॅरी केनने नोंदवला. ‘‘हंगामाची सुरुवात जेतेपदासह करणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आमचा आत्मविश्वास दुणावला असून बुंडसलिगाच्या नव्या हंगामासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे केन म्हणाला. केनचे हे कारकीर्दीतील दुसरे जेतेपद होते. मे महिन्यात बायर्नने ‘बुंडसलिगा’ जिंकली होती. त्या वेळी केनने पहिल्या जेतेपदाचा अनुभव घेतला होता.
जर्मन सुपर चषकात केननेच बायर्नला आघाडी मिळवून दिली. त्याने १८व्या मिनिटाला हा गोल केला. यानंतर बायर्नने चेंडूवर ताबा राखला होता. तसेच त्यांनी गोलच्या काही संधीही निर्माण केल्या, पण त्यांना मध्यंतरापर्यंत केवळ एका गोलच्या आघाडीचे समाधान लाभले. उत्तरार्धातही बायर्नचे वर्चस्व राहिले. सामन्याच्या ७७व्या मिनिटाला सर्ज गनाब्रीच्या पासवर लुइस डियाझने गोल करत बायर्नची आघाडी दुप्पट केली. नव्या हंगामापूर्वी बायर्नने डियाझला इंग्लिश क्लब लिव्हरपूलकडून आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्याने पहिल्याच सामन्यात गोल करत हा विश्वास सार्थ ठरवला.
यानंतर स्टुटगार्टने पुनरागमनाचा प्रयत्न केला. स्टुटगार्टचा आघाडीपटू निक वोल्टेमेडने मारलेला फटका बायर्नचा गोलरक्षक मॅन्युएल नॉयरने अप्रतिमरीत्या अडवला. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत जेमी लेव्हलिंगने स्टुटगार्टचे गोलखाते उघडले. मात्र, त्यांना दुसरा गोल करता आला नाही आणि बायर्नने जेतेपद पटकावले.