नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषक पटकावणाऱ्या महिला संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघाला विजेतेपदासाठी ‘आयसीसी’कडून मिळालेल्या रोख पारितोषिकापेक्षा ही रक्कम अधिक आहे. महिला संघाला विजेतेपदासाठी ३९ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

‘‘भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून सर्व संघाला ५१ कोटी रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षकांचा चमू आणि राष्ट्रीय निवड समितीचा समावेश असेल,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.

मिरवणूक नाही

‘‘भारतीय महिला संघाची विजयी मिरवणूक काढण्याचे सध्या तरी नियोजन नाही. ‘आयसीसी’च्या बैठकीसाठी मी लगेच दुबईला रवाना होत आहे. माझ्यासह ‘बीसीसीआय’चे अन्य काही पदाधिकारीही येत आहेत. तिथे आम्ही आशिया चषकाचा मुद्दा उपस्थित करणार आहोत,’’ असेही सैकिया यांनी सांगितले.