Short Run Rule In Cricket: क्रिकेटचा पहिला अधिकृत सामना सुरू होऊन १५० वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. क्रिकेटचं स्वरूप बदललं. यासह गरजेनुसार नियमही बदलण्यात आले आहेत. आता बीसीसीआयने शॉर्ट रन घेण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. काय आहे तो नियम? जाणून घ्या.
जेव्हा संघाला धावांची गरज असते त्यावेळी मुख्य फलंदाज स्ट्राइकवर असणं खूप गरजेचं असतं. अशावेळी फलंदाज शॉट मारल्यानंतर दोन धाव घेत असताना एकच धाव घेतो आणि दुसरी धाव पूर्ण न करताच स्ट्राइकवर परततो. त्यामुळे एक धाव कमी मिळते, पण मुख्य फलंदाजाला स्ट्राइकवर येण्याची संधी मिळते. या नियमाचा फलंदाज गैरफायदा घेत असल्याचं निदर्शनात आलं. त्यामुळे बीसीसीआयने या नियमात बदल करण्याचं ठरवलं आहे.
असं करण्याचं एकमेव कारण म्हणजे, मुख्य फलंदाजाला स्ट्राइकवर घेऊन येणं. पण टी-२० क्रिकेट, फ्रेंचायझी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये हे रोखण्यासाठी आधीपासूनच नियम तयार करण्यात आले आहेत. असं घडल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जातात. हा निर्णय मॅच रेफरीपर्यंतही जाऊ शकतो.
शॉर्ट रन घेतल्यास कर्णधार घेणार निर्णय
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आता बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, जर फलंदाज मुद्दाम शॉर्ट रन घेत असेल तर कोणता फलंदाज स्ट्राइक घेणार, हे विरोधी संघातील कर्णधार ठरवेल. पण जर पंचांना वाटत असेल की, हे चुकून झालं आहे तर अशी कारवाई केली जाणार नाही.
काय आहे नवीन नियम?
१.जर मुद्दाम शॉर्ट रन घेतला गेला, तर पंच त्या चेंडूवर घेतलेले कोणतेही धावा अमान्य ठरवतील.
२. क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला ५ अतिरिक्त धावा दिल्या जाऊ शकतात.
३. विरोधी संघाच्या कर्णधाराकडे कोणत्या फलंदाजाला स्ट्राइकवर ठेवायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असेल.
४. त्यानंतर स्कोअर अपडेट केला जाईल.