देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
BCCI Message to Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेसाठी तयारी करत आहेत. टी-२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित विराट फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतात. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत रोहितने उत्कृष्ट कामगिरी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तर विराट कोहली एका सामन्यात फक्त अर्धशतकी खेळी करण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान आता बीसीसीआयने रोहित-विराटला वनडे सामने खेळायचे असतील तर एक अट घातली आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिकेनंत आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेत खेळताना दिसणार आहेत. ही एकदिवसीय मालिका घरच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांनंतर ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होईल आणि यानंतर थेट जानेवारीमध्ये संघ पुढील वनडे मालिका खेळणार आहे.
रोहित शर्मा विराट कोहलीला जर भारताच्या एकदिवसीय संघात स्थान टिकवायचं असेल, तर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधूनच मार्ग काढावा लागणार आहे. असा संदेश भारतीय क्रिकेट मंडळाने दोन्ही दिग्गज खेळाडूंना दिला आहे. २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे. हा एकमेव वनडे सामना आहे, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर आणि न्यूझीलंडविरूद्ध मालिकेपूर्वी खेळवला जाणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) कळवलं आहे की तो विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी उपलब्ध असेल. मात्र, विराट कोहलीच्या उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
३७ वर्षीय कोहली आणि ३८ वर्षीय रोहित यांनी शेवटचा वनडे सामना गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दोघांनी मिळून भारताला विजय मिळवून देणारी भागीदारी रचली होती. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत रोहित चमकला होता आणि तिसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावलं होतं, तर कोहलीने पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर अखेरच्या सामन्यात नाबाद ८७ धावा करत दमदार पुनरागमन केलं.
“भारतीय संघात खेळायचं असेल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळणं आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश मंडळाने आणि संघ व्यवस्थापनाने दोघांनाही दिला आहे. दोघांनीही दोन स्वरूपातून (कसोटी आणि टी-२०) निवृत्ती घेतली असल्याने, फिटनेस आणि फॉर्म टिकवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे,” असं इंडियन एक्सप्रेसला बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, भारतीय क्रिकेट मंडळाला आता लंडनमध्ये राहणारा कोहली देखील देशांतर्गत क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या हंगामात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक रणजी सामना खेळला होता. जानेवारीत कोहली तब्बल १२ वर्षांनी दिल्लीसाठी रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तर रोहित १० वर्षांनी मुंबईकडून खेळताना दिसला.
