भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय ) आज ( १८ ऑक्टोंबर ) बैठक पार पडली. सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपल्याने या बैठकीत रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जय शाह यांना सचिवपदी तर, उपाध्यक्षपदी राजीव शुक्लांना कायम ठेवण्यात आलं आहे. मात्र, सौरव गांगुलींची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी ) अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, आता ती आशाही मावळली आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, ग्रेग बार्कले यांना आयसीसीच्या अध्यक्षपदावर कायम ठेवण्यासाठी बीसीसीआय पाठिंबा देणार आहे. त्यामुळे सौरव गांगुलीचा आयसीसी अध्यक्षही होण्याचा पत्ता कट झाला आहे. तर, आयसीसीमध्ये बीसीसीआयचे दोन प्रतिनिधी पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी जय शाह यांचे नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा : BCCI च्या तिजोरीच्या चाव्या आशिष शेलारांच्या हाती; कोषाध्यक्षपदी लागली वर्णी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बीसीसीआय अध्यक्षपदी सौरव गांगुलींची वर्णी न लागल्याने धक्का बसल्याचं सांगितलं होते. “बीसीसीआय अध्यक्ष असताना सौरव गांगुलीने उत्तम प्रशासक असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र, त्याला अध्यक्षपदावरून हटवल्याने मला धक्का बसला असून, हा सौरववर अन्याय आहे. आता आयीसीसी अध्यक्षपदासाठी सौरवला निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी, अशी पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार आहे. याप्रकरणात कोणतेही राजकारण होऊ नये,” अशी अपेक्षाही मुख्यमंत्री बॅनर्जींनी व्यक्त केली होती.