एका वर्षांमध्ये ३६५ दिवस असले यंदाच्या वर्षांत तब्बल ९०० सामने खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. युवा गुणवत्तेला चालना मिळून त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी जास्तीत जास्त स्थानिक सामने खेळता यावेत, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर देवधर करंडक व हजारे चषक स्पर्धाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे अध्यक्ष असलेल्या तांत्रिक समितीने काही निर्णय दिले होते, त्यावर बीसीसीआय अंमलबजावणी करताना दिसत आहे.
त्यानुसार मंडळाने देवधर करंडक पाच विभागीय संघांऐवजी तीन संघांमध्ये होईल. २४ ते २८ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा घेतली जाईल व पन्नास षटकांचे चार सामने खेळविले जातील. चॅलेंजर स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. हजारे चषक स्पर्धेतील विजेता संघ, तसेच भारत ‘अ’ व भारत ‘रेड’ या तीन संघांमध्ये हे सामने होतील. हजारे चषक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारत ‘अ’ व भारत ‘रेड’ या संघांची निवड केली जाईल.
रणजी स्पर्धेप्रमाणेच देशातील सर्व संघांची चार विभागांत विभागणी केली जाईल. गत वर्षी रणजी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे ही विभागणी केली जाणार आहे. रणजी स्पर्धेप्रमाणेच त्यांचे एक दिवसीय सामने होतील.
कनिष्ठ गटासाठी १९ वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय कनिष्ठ निवड समितीकडून तीन संघांची निवड केली जाईल व या तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाईल. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १९ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे यासाठी २३ वर्षांखालील गटाची आंतरराज्य व त्यानंतर आंतरविभागीय एक दिवसीय सामन्यांची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्याखेरीज वरिष्ठ गटाच्या महिलांकरिता तीन दिवसांची आंतरविभागीय स्पर्धा आयोजित केली जाईल.
दुलीप करंडकाला स्थगिती
मुंबई : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे ५० वर्षांची परंपरा लाभलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या वर्षांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१५-१६ च्या स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका निश्चित केली आहे, मात्र त्यामध्ये या स्पर्धेला स्थान मिळालेले नाही.
आंतरविभागीय स्तरावरील सामन्यांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी १९६१-६२ मध्ये दुलीप स्पर्धा आयोजित केली जात होती. भारतीय कसोटी संघ निवडण्यासाठी ही स्पर्धा व्यासपीठ समजले जात असे. विशेषत: परदेशातील संघ निवडण्याकरिता या स्पर्धामधील सांख्यिकी कामगिरीचा निवड समितीस खूप उपयोग होत असे. मंडळाने एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्थानिक सामन्यांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. त्यामध्ये नऊशे सामन्यांचा समावेश असला तरी दुलीप स्पर्धेचा त्यामध्ये समावेश नाही.