Ben Stokes First captain to win a match without batting and keeping: इंग्लंड आणि आयर्लंड संघांतील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला. या कसोटी सामन्यात आयर्लंडचा पहिला डाव ५६.२षटकांत १७२ धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव ४ गड्यांच्या मोबदल्यात ५२४ धावा करून डाव घोषित केला. बेन स्टोक्सची ऐतिहासिक कामगिरी - त्यानंतर दुसऱ्या डावात आयर्लंडने ९ विकेट गमावत ३६२ धावा केल्या आणि इंग्लंडला ११ धावांचे लक्ष्य दिले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने केवळ ४ चेंडूतच लक्ष्य गाठले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक अनोखा विक्रम करत इतिहास रचला आहे. या विजयासह तो कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात फलंदाजी, गोलंदाजी किंवा किपिंगशिवाय सामना जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. ६ पेक्षा जास्त धावगतीसह ४००+ कसोटी धावा करणारा इंग्लंड एकमेव संघ - बेन स्टोक्सच नाही तर इंग्लंडनेही या कसोटी सामन्यात इतिहास रचला. इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध ६.३३ च्या धावगतीने ५२४ धावा केल्या. यापूर्वी त्यानी पाकिस्तानमध्ये ६.५०च्या धावगतीने ६५७ धावा केल्या होत्या. १४५ वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणत्याही संघाने कसोटी सामन्याच्या एका डावात ६.०० धावांच्या दराने ४०० धावा केल्या नाहीत. इंग्लंडकडून पहिल्या डावात ऑली पोपने २०५ आणि बेन डकेटने १८२ धावा केल्या. बेन डक्टने १७८ चेंडूंच्या खेळीत २४ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी ओली पोपने २०८ चेंडूंच्या खेळीत २२ चौकार आणि ३ षटकार मारले. हेही वाचा - FA Cup Final 2023: मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेडच्या सामन्याला भारतीय क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो आयर्लंडकडून दुसऱ्या डावात अँडी मॅकब्राईन ८६ धावांवर नाबाद राहिला. त्याने ११५ चेंडूत १४ चौकार मारले. मार्क एडेर ७६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८८ धावा करून बाद झाला. या सामन्याने इंग्लंडच्या जोश टंगने कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात त्याला एकही विकेट घेता आली नाही, पण दुसऱ्या डावात त्याने २० षटकात ६६ धावांत ५ बळी घेतले.