Ravindra Jadeja Ben Stokes Fight Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघाने सलग ५ सत्र फलंदाजी करत इंग्लंडकडून विजयाचा घास हिरावून घेतला. पण या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार आणि खेळाडूंना फार ट्रोल केलं जात आहे. स्टोक्स खेळभावनेच्या गोष्टी करत असतो, पण चौथ्या कसोटीत त्याची कृती पाहून त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. अखेरच्या षटकांमध्ये झालेल्या ड्रामामध्ये स्टोक्स जडेजाला नेमकं काय म्हणाला होता, पाहूया.
टीम इंडियाविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खेळभावनेचं उघडपणे उल्लंघन करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. मँचेस्टर कसोटी सामन्यात, चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत, इंग्लंड एका डावाने विजय मिळवेल असं चित्र दिसत होतं. त्यांनी टीम इंडियावर ३११ धावांची आघाडी घेतली होती आणि खातंही न उघडता भारताने २ विकेट्स गमावले होते. पण नंतर कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्यातील १८८ धावांच्या भागीदारीने त्यांना बॅकफूटवर ढकलले.
बेन स्टोक्स आणि जडेजामध्ये कशावरून झाला वाद?
पाचव्या दिवशी राहुल-गिल बाद झाल्यानंतर इंग्लंड जिंकेल असं त्यांना वाटत होतं, पण रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. दोघांनीही शेवटच्या दोन सत्रात फलंदाजी केली आणि २०३ धावांची नाबाद भागीदारी केली आणि सामना अनिर्णित राहिला. पण १५ षटकांचा सामना बाकी असताना स्टोक्सने अचानक जडेजा आणि सुंदर यांच्याशी हात मिळवण्यासाठी गेला आणि अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव मांडला.
जडेजा आणि सुंदरने त्याचा प्रस्ताव नाकारला आणि यानंतर स्टोक्स ज्याप्रमाणे वागला ते पाहून त्याच्यावर टीका होऊ लागली. खरंतर, जेव्हा स्टोक्सने ड्रॉसाठीचा प्रस्ताव दिला तेव्हा दोन्ही भारतीय फलंदाज शतकाच्या जवळ होते. जडेजा ८९ आणि सुंदर ८० धावांवर खेळत होते. यादरम्यान स्टोक्सने जडेजासह वाद झाला. दरम्यान दोघांमधील संवादाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या खेळाडूंनी जडेजाला घेरलं
इंग्लंडचे खेळाडू जडेजाला हात मिळवत सामन्याचा निकाल लागावा, यासाठी मनवत होते, तेव्हा एक जण जडेजाला म्हणाला, तुम्हाला जर शतकं पूर्ण करायची होती, तर पहिल्यापासून तसं खेळायचं. यानंतर स्टोक्स जडेजाजवळ गेला आणि म्हणाला, “जड्डू तुला बेन डकेट आणि हॅरी ब्रूकसारख्या पार्ट टाईम गोलंदाजांसमोर शतक करायचंय?” यावर जडेजा म्हणाला, “तुझं काय म्हणणं आहे की मी बाहेर जाऊ?”
तितक्यात क्रॉली जडेजाजवळ आला आणि म्हणाला, जड्डू हात मिळव म्हणजे सामना इथेच संपेल. जडेजा म्हणाला, “मी काही नाही करू शकत.” यानंतरही इंग्लंडचे खेळाडू जडेजाला मनवत होते, पण जडेजा आणि सुंदर शतक करूनच थांबले आणि सामना अनिर्णित राहिला.
बेन स्टोक्सने सामन्यानंतर याचा राग काढत वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाला हातदेखील मिळवला नाही आणि पुन्हा जडेजाबरोबर वाद घालताना दिसला. बेन स्टोक्सचं मैदानावरील हे वागणं पाहून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.