लंडन : इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू बेन स्टोक्सने आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेत सहभागी न झाल्याने ताकदीने गोलंदाजी करण्याकरिता तंदुरुस्ती मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल, असे स्टोक्स म्हणाला. इंग्लंडचा कसोटी कर्णधार असलेल्या स्टोक्सने अमेरिका व वेस्ट इंडिज येथे सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या दोन महिन्यांपूर्वीच इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाला याची माहिती दिली आहे.

‘‘मी मेहनत घेत असून गोलंदाजीसाठी लागणारी तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यामुळे क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांत अष्टपैलू म्हणून भूमिका बजावण्यास मी सक्षम असेन. ‘आयपीएल’ व विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहिल्याने मला चांगला अष्टपैलू बनण्यास मदत मिळेल, जे नेहमीच मला बनायचे होते,’’ असे स्टोक्स इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या निवेदनात म्हणाला. स्टोक्स भारताच्या कसोटी दौऱ्यात इंग्लंड संघाचा कर्णधार होता. या मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben stokes withdraws from twenty20 world cup sport news amy
First published on: 03-04-2024 at 05:29 IST