नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डावाच्या उत्तरार्धातील षटकांमधील भुवनेश्वर कुमारची सुमार कामगिरी भारतासाठी चिंतेची बाब ठरत असल्याची प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली.
गेल्या काही सामन्यांत उत्तरार्धात षटकांत गोलंदाजी करताना भुवनेश्वरने खूप धावा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्यानेच टाकलेले १९वे षटक निर्णायक ठरले. त्या षटकांत १६ धावा निघाल्या. ‘‘खेळपट्टीवरील दवाचा फारसा फरक पडला नाही. क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज फारसे हात पुसताना दिसून आले नाहीत. अर्थात, हे कारण असू शकत नाही. आपण गोलंदाजी चांगली केली नाही. विशेषत: १९वे षटक खूपच खराब टाकले गेले,’’ असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
‘‘जेव्हा धावा रोखण्याची आवश्यकता होती तेव्हा प्रत्येक वेळेस भुवनेश्वरने धावा दिल्या आहेत. आशिया चषकातील पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १९वे षटक टाकले. या १८ चेंडूंत त्याने ४९ धावा दिल्या आहेत. या धावा ३०-३५ पर्यंत असायला हव्या होत्या,’’ असेही गावस्कर म्हणाले.
भुवनेश्वरचा अनुभव कुचकामी ठरत असताना जसप्रित बुमराने लवकरात लवकर संघात परतणे आवश्यक असल्याचे गावस्कर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीची आणि अखेरची पाच षटके नेहमीच निर्णायक ठरत असतात. बुमरा प्रारंभी दणके देत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणतो. तेदेखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध जमले नाही.’’
क्षेत्ररक्षणाच्या दर्जावर शास्त्री यांचे टीकास्र
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. ‘‘भारतीयांच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा अत्यंत खराब होता. मोठय़ा आव्हानाचा बचाव करताना भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन झेल सोडले. गेल्या काही सामन्यांत भारतीय संघ युवा आणि अनुभवी खेळाडूंचा होता. पण आज मैदानात युवा खेळाडू दिसलेच नाहीत. त्याचा परिणाम क्षेत्ररक्षणावर झाला,’’ असे शास्त्री म्हणाले. ‘‘क्षेत्ररक्षण चांगले व्हायलाच हवे. यात तुम्ही कमी पडलात. संघात जडेजा नाही. त्याची जागा घेणाऱ्या अक्षर पटेलने ग्रीनला वैयक्तिक ४२ धावांवर असताना जीवदान दिले. पुढच्याच षटकांत केएल राहुलने झेल सोडला. ही दोन जीवदाने खूपच महागात पडली,’’ असेही शास्त्री म्हणाले.
बुमराला परतण्यासाठी वेळ द्या -पंडय़ा
बुमरा निश्चितपणे तंदुरुस्त आहे. मैदानावर परतण्यासाठी त्याला थोडा वेळ द्यायलाच हवा. मैदानात उतरण्यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्यावर दबाव टाकणार नाही, असे पंडय़ाने सांगितले. ‘‘बुमरा भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे सर्वच जण जाणतात. अशा वेळी आपण उपलब्ध गोलंदाजांवर विश्वास दाखवायला हवा. हे देशातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत, म्हणून ते संघात आहेत,’’ असेही पंडय़ाने सांगितले. ‘‘आम्ही नियोजनाप्रमाणे गोलंदाजी करू शकलो नाही, हे सत्य आहे. पहिलाच सामना आहे. आगामी दोन सामन्यांत आम्ही निश्चित कामगिरी उंचावू,’’ असा विश्वासही पंडय़ाने व्यक्त केला.
बाबरला मागे टाकत सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी
दुबई : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (७८० गुण) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत बुधवारी ‘आयसीसी’च्या ताज्या ट्वेन्टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४६ धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा एडिन मार्करम (७९२ गुणांसह) दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ा २२ स्थानांच्या आगेकुचीसह ६५व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या.
जागतिक कसोटी अंतिम लढत ओव्हलवर
दुबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतींसाठी ओव्हल आणि लॉर्डसची निवड करण्यात आली आहे. ओव्हलवर २०२३, तर लॉर्डसवर २०२५ मधील अंतिम लढत खेळविण्यात येईल. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या आगामी दोन अंतिम लढती इंग्लंडमध्ये खेळविण्याचा निर्णय याच वर्षी जुलै महिन्यात घेण्यात आला होता. दुसऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेस ४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, ३१ मार्च २०२३ रोजी संपेल. गुणतक्त्यात सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.
