टीम इंडियासाठी पुन्हा खेळताना दिसणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने निवडसमितीला सूचक टोला लगावला आहे.

‘मैदानावर १०० टक्के योगदान देणं हे माझं काम आहे. मी तेच करतो आहे. येत्या काही महिन्यात मला सय्यद मुश्ताक अली स्पर्धा असो किंवा रणजी किंवा वनडे स्पर्धेत उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन’. भारताकडून खेळताना पुन्हा दिसणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर भुवनेश्वर म्हणाला, ‘याचं उत्तर निवडसमितीच देऊ शकेल’.

उत्तर प्रदेश प्रीमिअर लीग स्पर्धेत भुवनेश्वर लखनौ फाल्कन्स संघाचं नेतृत्व करत आहे. कर्णधारपदाच्या बरोबरीने भुवनेश्वर फाल्कन्स संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका समर्थपणे निभावत आहे.

२०२२ मध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपनंतर भुवनेश्वर भारतीय संघाकडून खेळलेला नाही. ३५वर्षीय भुवनेश्वरला टीम इंडियासाठी पुनरागमनासंदर्भात विचारण्यात आलं. १२१ वनडे, २१ कसोटी आणि ८७ टी२० सामन्यात भुवनेश्वरने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तिन्ही प्रकारात मिळून भुवनेश्वरने २९४ विकेट्स पटकावल्या आहेत. तीन वर्षांपासून भुवनेश्वर कुमारला टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. फिटनेस आणि फॉर्म हे दोन मुद्दे भुवनेश्वरला वगळण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. मात्र गेले काही महिने भुवनेश्वर सातत्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो आहे.

‘फिटनेस आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे हे माझं उद्दिष्ट आहे. तुम्ही कशी कामगिरी करता याइतकंच तुमचं नशीबही मोलाचं ठरतं. भारतीय संघाला एका चांगल्या गोलंदाजाची आवश्यकता आहे. मात्र निवडसमितीने त्याच्या नावाचा विचार केलेला नाही’, असं भुवनेश्वर म्हणाला.

राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले आहेत. ते उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व करतात. यामुळे भुवनेश्वरची उत्तर प्रदेशकडून खेळण्याची शक्यता वाढली आहे. यासंदर्भात भुवनेश्वरला विचारलं असता तो म्हणाला, ‘कामगिरी हा सर्वोत्तम निकष असायला हवा. एखादा खेळाडू सातत्याने चांगलं खेळत असेल तर निवडसमिती फार काळ त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जरी तुमची भारतीय संघात निवड झाली नाही तरी ज्या स्पर्धेत खेळता आहात त्यात १०० टक्के योगदान देणं आवश्यक आहे. बाकी गोष्टी निवडसमितीच्या हातात आहेत. राजीव शुक्ला आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आले आहेत. प्रतिभावान खेळाडूकडे दुर्लक्ष होणार याची खात्री वाटते’.

भुवनेश्वरने तिन्ही प्रकारात स्वत:ला सिद्ध केलं आहे. देशातील सर्वोत्तम स्विंग गोलंदाज अशी बिरुदावली मिळूनही राष्ट्रीय संघाचे दरवाजे भुवनेश्वरसाठी बंद झाले. भारतीय संघाला चांगल्या अनुभवी गोलंदाजाची नितांत आवश्यकता असतानाही भुवनेश्वरच्या नावाचा विचार होत नाही याचं चाहत्यांना वाईट वाटतं. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. डोमेस्टिक क्रिकेटचा हंगाम सुरू होतो आहे. भारतीय संघाला वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचं आहे. उत्तर प्रदेश प्रीमिअर लीगमधला फॉर्म भुवनेश्वरला पुन्हा राष्ट्रीय संघात संधी मिळवून देऊ शकतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.