Pat Cummins Ruled Out Of IND vs AUS Series: येणारे काही महिने ऑस्ट्रेलिया संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण या कालावधीत काही ऑस्ट्रेलियाचा संघ काही महत्वाच्या मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑक्टोबरमध्ये भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत दोन हात करणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे भारत आणि न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तर त्याच्या अॅशेस मालिकेत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वेस्टइंडिज दौऱ्यावर गोलंदाजी करत असताना पॅट कमिन्सला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवला होता. वैद्यकीय तपासणीत पाठीच्या खालच्या भागात ताण आल्याचे स्पष्ट झाले. अॅशेस मालिका ही ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्वाची आहे. ऑस्ट्रेलियाला जर अॅशेस मालिका जिंकायची असेल, तर पॅट कमिन्स पूर्णपणे फिट असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे की, कमिन्स तोपर्यंत पूर्णपणे असायला हवा.

येत्या २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंडविरूद्ध होणारी मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. पण तो या मालिकेला मुकणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. २०२१ मध्ये त्याच्याकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं जेतेपद मिळवून दिलं. स्पर्धेच्या या हंगामातही त्याने ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, केवळ २ सामने तो दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. मात्र अॅशेस मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होता.

या खेळाडूला मिळू शकते नेतृत्वाची जबाबदारी

आगामी अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी जर कमिन्स पूर्णपणे फिट नसेल, तर ही जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवली जाऊ शकते. तर कमिन्सच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँडचा संघात समावेश केला जाऊ शकतो. स्मिथ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. याआधी देखील श्रीलंकेविरूद्ध तो ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.