India vs England 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये रंगणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण २ सामने जिंकून इंग्लंडचा संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिका जिंकायची असेल तर चौथा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाला आहे.
अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त
अर्शदीप सिंगला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. पण त्याला पदार्पणाची संधी दिली गेलेली नाही. आता चौथ्या कसोटीपूर्वी सरावादरम्यान गोलंदाजी करत असताना साई सुदर्शनने मारलेला चेंडू त्याच्या हाताला लागल्याने दुखापत झाली आहे. मात्र, मेडिकल टीमने त्वरित त्याच्यावर उपचार केले.
लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने मँचेस्टर कसोटी जिंकण्यासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. या सामन्यासाठी जर कुठल्याही गोलंदाजाला विश्रांती दिली जाणार असेल, तर २६ वर्षीय अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. पण त्याला संधी मिळणार की नाही, हे त्याची दुखापत किती गंभीर आहे यावर अवलंबून असणार आहे.
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेट म्हणाले, “ साई सुदर्शन फलंदाजी करत असताना अर्शदिप सिंग गोलंदाजीला आला. साई सुदर्शनने मारलेला शॉट अडवण्यासाठी अर्शदीप सिंगने हात टाकला. पण त्याच्या हाताला दुखापत झाली. मेडिकल टीम त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली आहे. त्याला टाके मारावे लागतील की नाही हे लवकरच कळेल.
जसप्रीत बुमराह खेळणार का?
जसप्रीत बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार हे आधीपासून ठरलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली होती. आता तो शेवटच्या २ पैकी एका सामन्यात खेळताना दिसेल. पण मँचेस्टर कसोटी ही भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसेल. त्यानंतर शेवटच्या कसोटीत तो खेळणार की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.