Chris Woakes Picks 2 Wickets In 1st Over: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला ३५८ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना ३ अर्धशतकं झळकावली. तर रूट आणि स्टोक्सने दमदार शतक झळकावलं. यासह इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारत ३११ धावांची भक्कम आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. पहिल्याच षटकात भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत.
या सामन्यातील पहिल्या डावात ६०० पेक्षा अधिक धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव आटोपला. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानावर आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे ३ चेंडू यशस्वीने खेळून काढले. मात्र चौथ्या चेंडूवर यशस्वी आपली विकेट फेकून माघारी परतला.
यशस्वी- साई सुदर्शन शून्यावर बाद
ख्रिस वोक्सने षटकातील चौथा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने टाकला. या चेंडूवर जैस्वालने लेग स्टंपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटचा कडा घेत पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या जो रूटच्या हातात गेला. जो रूटकडून पहिल्या प्रयत्नात हा झेल सुटला. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने हा झेल पकडला. यासह भारतीय संघाला पहिल्याच षटकात पहिला मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर पुढील चेंडू खेळण्यासाठी साई सुदर्शन स्ट्राईकवर आला. ख्रिस वोक्सने ऑफ स्टंपवर चेंडू टाकला.
पहिलाच चेंडू खेळत असलेला साई सुदर्शन गोंधळून गेला. त्याने आधी चेंडू सोडण्याचा विचार केला. पण शेवटी बॅट लावली आणि चेंडू बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या हॅरी ब्रुकच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. त्यानंतर ख्रिस वोक्सला हॅट्रिक घेण्याची संधी होती. पण शुबमन गिलने हा चेंडू खेळून काढला. त्यामुळे ख्रिस वोक्सची हॅट्रीक राहून गेली.