Ruturaj Gaikwad News In Marathi: भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने इंग्लंडचा काउंटी क्लब यॉर्कशायर संघासोबत ५ सामन्यांचा करते केला होता. येत्या काही दिवसात तो या संघाकडून पदार्पण करणार होता. मात्र, त्याआधीच त्याने आपलं नाव मागे घेण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानं वैयक्तिक कारणामुळे माघार घेत असल्याचं कारण दिलं आहे. मात्र, ऋतुराज गायकवाडची माघार हा यॉर्कशायर संघाला मोठा धक्का आहे. कारण त्याची जागा भरून काढण्यासाठी यॉर्कशायर संघाला पुरेसा वेळ देखील मिळालेला नाही.
ऋतुराज गायकवाड भारतीय अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्याला भारतीय अ संघाकडून काही सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या सामन्यांमध्ये त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यानंतर त्याला काउंटी क्रिकेट खेळण्याची ऑफर आली. त्याने ही ऑफर स्वीकारली. ऋतुराज गायकवाडने माघार घेताच यॉर्कशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक अँथनी मॅकग्रा यांनी त्याला वॉर्निंग दिली आहे. त्याच्या बदली खेळाडूचा संघात समावेश करू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पण त्याचा बदली खेळाडू शोधण्यासाठी यॉर्कशायर संघाकडे पुरेसा शिल्लक राहिलेला नाही.
ऋतुराज गायकवाड आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करतो, पण या हंगामात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. त्याच्या जागी एमएस धोनी संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. ऋतुराजने या स्पर्धेतून माघार घेताच मुख्य प्रशिक्षक अँथनी मॅकग्रा म्हणाले, ” दु्र्दैवाने, ऋतुराज गायकवाड वैयक्तिक कारणास्तव खेळताना दिसून येणार नाही. आम्ही त्याला स्कारबोरो किंवा उर्वरीत हंगामासाठी संघात स्थान देऊ शकतन नाही. हे खूप निराशाजनक आहे. त्याने माघार का घेतली, यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण आशा करतो की, सर्वकाही ठीक असेल.”
तसेच ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे आता दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आम्ही आता काय करावं हेच मला कळत नाहीये. आम्ही त्याच्या रिप्लेसमेंटच्या शोधात आहोत. पण वेळ खूप कमी आहे. याहून अधिक मी काहीच सांगू शकत नाही.” ऋतुराज गायकवाडने अचानक माघार घेतल्याने यॉर्कशायर संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ४१.७७ च्या सरासरीने २६३२ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतकं झळकावली आहेत.