फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला हिरो होण्याची संधी आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये संघाला विजयी करुन देण्याची त्याला संधी आहे. यापुर्वी २००४ मध्ये पोर्तुगालने युरो चषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यावेळी रोनाल्डोने नुकतेच संघात पदार्पण केले होते. अवघ्या १९ व्या वर्षी रोनाल्डो पोर्तुगालकडून पहिल्यांदा युरो चषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात ग्रीसने आश्चर्यकारकरित्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत युरो चषकावर कब्जा केला होता. यानंतर तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा रोनाल्डो आज फ्रान्स विरुद्ध पोर्तुगालला युरोचषक देण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरेल. फ्रान्सचा संघ पोर्तुगालच्या तुलनेने वरचढ असला तरी, रोनाल्डोच्या खेळीने पोर्तुगाल या सामन्यात करिश्मा करेल, अशी रोनाल्डोच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. फ्रान्सचा अॅँटोनी ग्रिझमन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील चुरस पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, सोशल मिडीयावरही फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता दिसून येत आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील क्लब सामन्यात रोनाल्डो हा फ्रान्सच्या अॅँटोनी ग्रिझमन याच्यापेक्षा भारी ठरला आहे. मात्र क्लब सामन्यातील रोनाल्डो आणि अॅँटोनी ग्रिझमन यांच्यातील संघ समतुल्य होता. पण राष्ट्रीय संघाचा विचार करता रोनाल्डो विरुद्ध फ्रान्स असे समीकरण दिसते आहे. अँटोनी ग्रिझमन या फ्रान्सच्या हुकमी खेळाडूसमोर क्लब सामन्यात खेळताना रोनाल्डो नेहमी सरस ठरला आहे. त्यामुळे फ्रान्समधील या स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या हिरोवर मात करुन राष्ट्रीय संघासाठी खेळताना हिरो बनण्याची आज रोनाल्डोकडे संधी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2016 रोजी प्रकाशित
युरोमध्ये हिरो बनण्याची रोनाल्डोला संधी
रोनाल्डोची बारा वर्षांची प्रतिक्षा संपणार का?
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-07-2016 at 16:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big opportunity for ronaldo