पीटीआय, बंगळूरु
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) क्रीडा विधेयकानुसार माहितीच्या अधिकारात येणार नसले, तरी विधेयकातील उर्वरित तरतुदी त्यांना बंधनकारक असतील. अशाच एका तरतुदीचा फायदा अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना झाला असून, ७० वर्षीय रॉजर बिन्नी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत अध्यक्ष राहू शकतात.
विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती ७० वर्षे होण्यापूर्वी अध्यक्ष असेल, तर त्याला अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर अन्य राज्य संघटनेच्या सहमतीनुसार ती व्यक्ती ७५ वर्षांपर्यंत अध्यक्ष राहू शकते. अर्थात, ‘आयसीसी’च्या घटनेनुसार अध्यक्षपदासाठी वयाची कुठलीच अट नाही.
विधेयक स्वीकारायचे की नाही यावर अजून ‘बीसीसीआय’चा निर्णय झालेला नाही. पण, या तरतुदीचा फायदा बिन्नी यांना मिळणार आहे. आता त्यानंतर त्यांनी अध्यक्ष राहायचे की नाही याचा निर्णय अन्य सदस्य आणि ‘बीसीसीआय’शी निगडित ताकदवान व्यक्तीच घेऊ शकणार आहेत.
‘बीसीसीआय’ची कायदेशीर समिती अजून विधेयकाचा अभ्यास करीत आहे. आमच्याकडे यासाठी अजून थोडा वेळ आहे, त्यामुळे कायदेशीर समितीच्या सल्ल्यानुसार विधेयकाबाबत ‘बीसीसीआय’ पावले उचलणार आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.