विश्वचषकापूर्वी जेम्स रॉड्रिगेझ हे नाव फारसे कुणाला माहितीही नव्हते. मात्र स्पर्धा सुरू झाल्यानंतर या युवा, तडफदार आणि ‘चॉकलेट हिरो’ शोभेल अशा व्यक्तिमत्वाच्या कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझचे नाव सगळ्यांच्या मुखी आहे. यंदाच्या विश्वचषकात त्याच्या नावावर तब्बल सहा गोल आहेत. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तूर्तास तरी तो अव्वल स्थानी आहे आणि सगळ्यात प्रतिष्ठेच्या गोल्डन बूट पुरस्कारासाठी त्याचे नाव चर्चेत आहे. एकिकडे जिथे चाहते त्याच्या प्रेमात आहेत, तर दुसरीकडे नाकतोडाही त्याच्या प्रेमात पडला.
 रॉड्रिगेझचा खेळ याचि देहा याचि डोळा पाहण्यासाठी कोलंबियाच्या लढतींना प्रचंड गर्दी होते आहे. अनेक मोठे क्लब्स त्याला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. फुटबॉल विश्वाचा उगवता तारा म्हणून त्याची संभावना होते आहे. अशा या रॉडिगेझची भुरळ निरुपद्रवी नाकतोडय़ालाही पडली. रॉड्रिगेझचा खेळ आणि त्याला पाहण्यासाठी नाकतोडा साक्षात मैदानावर अवतरला. ब्राझीलविरुद्धच्या लढतीत कोलंबियाला चमत्काराची आवश्यकता होती. ब्राझीलने आघाडी घेत कोलंबियावर दडपण आणले. याचक्षणी रॉड्रिगेझच्या अंगात चैतन्य संचारले आणि पेनल्टीच्या आधारे गोल करत कोलंबियाची पिछाडी भरून काढली. गोल केल्यानंतर रॉडिगेझच्या आनंदाला उधाण आले. मात्र जल्लोषाच्या नादात रॉड्रिगेझला एक गोष्ट लक्षात आली नाही. त्याच्या उजव्या दंडावर एका नाकतोडय़ाने हजेरी लावली होती. नाकतोडय़ाने रॉड्रिगेझला डंखही केला मात्र तो बिनविषारी असल्याने रॉड्रिगेझला कोणताही दुखापत झाली नाही. गोल केल्यानंतरही हा नाकतोडा रॉड्रिगेझच्या दंडावरच होता.
विश्वचषकाच्या माध्यमातून रॉड्रिगेझच्या चाहत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र निसर्गातला हा भिडूही त्याला पाहायला अवतरल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.