‘एटीपी’ मास्टर्स अजिंक्यपद मिळवणारा बोपन्ना सर्वात वयस्क खेळाडू

पीटीआय, इंडियन वेल्स (अमेरिका) : भारताचा रोहन बोपन्नाने आपला साथीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅट एबडेनसह बीएनपी पारिबा खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले. या ‘एटीपी’ मास्टर्स (१००० दर्जा) स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवणारा बोपन्ना सर्वात वयस्क खेळाडू बनला आहे. बोपन्ना आता ४३ वर्षांचा आहे. त्याने आणि ३५ वर्षीय एबडेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सच्या वेस्ले कूलहोफ आणि ब्रिटनच्या नील स्कूपस्की या अग्रमानांकित जोडीला ६-३, २-६, १०-८ असे पराभूत केले.

आपल्या दहाव्या ‘एटीपी’ मास्टर्सच्या (१००० दर्जा) अंतिम फेरीत सहभाग नोंदवलेला बोपन्ना म्हणाला की,‘‘ माझी ही कामगिरी विशेष आहे. त्यामुळे त्याला टेनिसचे स्वर्ग संबोधले जाते. मी अनेक वर्षांपासून येथे सहभाग नोंदवत आहे आणि अनेकांना मी जेतेपद मिळवतानाही पाहिले आहे. मी आणि मॅट येथे जेतेपद मिळवण्यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. आम्ही अनेक चुरशीचे व कठीण सामने खेळलो. अंतिम सामन्यात आमच्यासमोर सर्वोत्तम खेळाडूंचे आव्हान होते. त्यामुळे हे जेतेपद आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’’

बोपन्नाने या कामगिरीनंतर कॅनडाच्या डॅनिएल नेस्टरला मागे टाकले. नेस्टरने २०१५मध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत ४२व्या वर्षी जेतेपद पटकावले होते. बोपन्नाचे एकूण पाचवे आणि २०१७मध्ये मॉन्टेकार्लो खुल्या टेनिस स्पर्धेनंतर पहिले मास्टर्स दुहेरी जेतेपद आहे. भारत व ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा या वर्षांतील तिसरा अंतिम सामना होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोपन्ना आणि एबडेन जोडीने उपांत्य फेरीत गतविजेता जॉन इस्नेर आणि जॅक सॉक जोडीला नमवले. त्यापूर्वी, त्यांनी उपांत्यपूर्व सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमे व डेनिस शापोवालोव जोडीला पराभूत केले. भारत-ऑस्ट्रेलियाच्या जोडीने आपल्या सुरुवातीच्या सामन्यात राफेल माटोस व डेव्हिड वेगा हर्नाडेज जोडीवर विजय मिळवला होता. या कामगिरीचा फायदा बोपन्नाला ‘एटीपी’ दुहेरी क्रमवारीत झाला आहे. बोपन्ना चार स्थानांच्या फायद्यासह ११व्या स्थानी पोहोचला आहे.