Bomb Blast in Pakistan cricket match video: पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यादरम्यान मोठी धक्कादायक दुर्घटना घडली आहे. क्रिकेट मैदानावर सामना सुरू असताना बॉम्बस्फोट झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे. या बॉम्बस्फोटात अनेक जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे. पण नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

शनिवारी संध्याकाळी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एका क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने खळबळ उडाली आहे. स्फोट झाला तेव्हा स्टेडियममध्ये सामना सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट मैदानावर आयईडी वापरून हा स्फोट करण्यात आला.

क्रिकेट मैदानावरील बॉम्बस्फोट हो कोणाला तरी लक्ष्य करून करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांविरुद्ध सुरू झालेल्या ऑपरेशन सरबकाफला प्रत्युत्तर म्हणून हा स्फोट घडवून आणल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या बॉम्बस्फोट झालेल्या घटनेचा व्हीडिओदेखील व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना बॉम्बस्फोट, व्हीडिओ होतोय व्हायरल

गेल्या शनिवारी, कोहट जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या एका घटनेत, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात एका हवालदाराचा मृत्यू झाला. लाची तहसीलमधील दारमलक पोलिस चौकीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी पोलिस व्हॅनला लक्ष्य केले, ज्यामध्ये एका हवालदाराचा मृत्यू झाला.

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांत हा बऱ्याच काळापासून दहशतवादी कारवायांचा गड मानला जात आहे. त्यामुळे, क्रिकेट सामन्यादरम्यान झालेला हा स्फोट केवळ सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा नसून तर दहशतवादी अजूनही सामान्य लोकांमध्ये दहशत पसरवण्यास सक्षम आहेत हे देखील दाखवणारा आहे.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या दुबईमध्ये आहे. युएई आणि अफगाणिस्तान यांच्याविरूद्ध हा संघ टी-२० तिरंगी मालिका खेळत आहे. या मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ खेळणार आहे. यानंतर ९ सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना १४ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तानचा संघ दुबईमध्ये एकाच मैदानावर सराव करतानाही दिसले. दरम्यान सर्वांच्या नजरा आता १४ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीवर असतील.