विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पाश्र्वभूमीवर नेयमारच्या दुखापतीमुळे चिंतेत सापडलेले ब्राझील आता नवा वाद ओढवून घेण्याची चिन्हे आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार थिआगो सिल्वाचे निलंबन उठवण्याची विनंती ब्राझीलने फिफाकडे केली आहे. सिल्वाचे निलंबन मागे घेण्याची मागणी फिफाने धुडकावल्यास जर्मनीविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलला दोन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव तीव्रपणे भासणार आहे.
शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिल्वाला देण्यात आलेले पिवळे कार्ड रद्द करण्यात यावे, अशी मागणी ब्राझील फुटबॉल महासंघाने फिफाकडे केली आहे. ‘‘सिल्वाला दाखवण्यात आलेले कार्ड हे अन्यायकारक आहे. त्यामुळे या बचावपटूला बेलो हॉरिझोंटे सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात यावी,’’ असे ब्राझील फुटबॉल महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
कोलंबियाच्या ज्युआन झुनिगाच्या ‘हिंसात्मक कृती’मुळे आघाडीवीर नेयमारला विश्वचषक स्पध्रेतून माघार घ्यावी लागली. या प्रकरणाची फिफाने सखोल चौकशी करावी, अशी मागणीसुद्धा ब्राझील फुटबॉल महासंघाने केली आहे. झुनिगाने या घटनेनंतर आपली दिलगिरी प्रकट केली आहे. तसेच नेयमारला दुखापत व्हावी, या इराद्याने हेतुपुरस्सरपणे आपण खेळ केला नव्हता, असे स्पष्टीकरण झुनिगाने दिले आहे.
दुखापतीनंतर मैदान सोडताना रडवेला नेयमार मला स्वत:च्या पायाच्या हालचालीच जाणवत नसल्याचे सांगत होता, अशी माहिती ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फिलिपे स्कोलारी यांनी ‘डेली मार्का’ या स्पॅनिश क्रीडा वृत्तपत्राला दिली आहे.