वृत्तसंस्था, दोहा : संभाव्य विजेत्यांच्या यादीत आघाडीवर असलेल्या ब्राझीलने ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस थाटात सुरुवात केली. उत्तरार्धात रिचार्लिसनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या ग-गटातील सामन्यात सर्बियाचा २-० असा पराभव केला.

उत्तरार्धातील गोलशून्यच्या बरोबरीनंतर उत्तरार्धात ब्राझीलने आपला सर्वोत्तम खेळ केला. प्रथम ६२व्या मिनिटाला गोलजाळीच्या अगदी समोरून आणि त्यानंतर७३व्या ‘ओव्हरहेड किक’ मारत रिचार्लिसनने ब्राझीलसाठी दोन गोल केले. विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यातच दोन गोल करणारा रिचार्लिसन हा ब्राझीलचा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी २०१४ मध्ये नेयमारने अशी कामगिरी केली होती.

ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी नेयमार, व्हिनिसियस ज्युनियर, राफिन्हा आणि रिचार्लिसन अशा चार आक्रमकांसह खेळण्याचा निर्णय घेतला. या चारही आक्रमकांनी प्रशिक्षक आणि चाहत्यांना निराश केले नाही. पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. नेयमारचे वैयक्तिक कौशल्य, व्हिनिसियसचा वेग आणि रिचार्लिसनची कल्पकता हे ब्राझीलच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. उत्तरार्धात ब्राझीलने आपल्या आक्रमणाची गती वाढवल्यानंतर सर्बियावर दडपण आले. त्यामुळे दुसऱ्या सत्रातील खेळ एकतर्फीच झाला.

पूर्वार्धात व्हिनिसियस आणि नेयमार यांनी आपल्या दोघांतच चेंडू राहील असा खेळ केला. मध्यंतरानंतर मात्र पहिल्या मिनिटापासून वेगळे चित्र दिसले. व्हिनिसियस आणि नेयमार यांनी आपल्यात रिचार्लिसनला सामावून घेतले. त्यानंतर दोन गोल नोंदवताना रिचार्लिसनने आपली गुणवत्ता सिद्ध केली. दुसरा गोल नोंदवताना त्याने ‘ओव्हरहेड किक’ मारण्याची दाखविलेली समयसूचकता भन्नाट होती.

नेयमारच्या दुखापतीची चिंता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्बियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान ब्राझीलचा तारांकित आघाडीपटू नेयमारला दुखापत झाली. त्यामुळे ब्राझीलच्या संघात चिंतेचे वातावरण आहे. नेयमारच्या डाव्या पायाच्या टाचेला दुखापत झाली. या दुखापतीमुळे नेयमार उर्वरित साखळी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. परंतु बाद फेरीसाठी त्याचे पुनरागमन होऊ  शकेल. सर्बियाविरुद्ध नेयमार दोन-तीन वेळा मैदानात जोरात पडला होता. अखेरच्या टप्प्यात नेयमारला मैदानाबाहेर बोलावण्यात आले. डगआऊटमध्ये नेयमार टाचेला बर्फ लावताना दिसून आला. तसेच त्याचा पाय सुजला होता.