बंगळूरु : आक्रमक शैलीत खेळताना इंग्लंडच्या कसोटी संघाने दर्जेदार कामगिरी केल्याचे समाधान असले तरी आता पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेत आम्हाला सर्वात मोठय़ा आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे मत इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलमने व्यक्त केले.

हेही वाचा >>> Cyclone Michuang : ‘माझ्या दुसऱ्या घरात पूर…’, सीएसकेसाठी खेळणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूने चेन्नईतील परिस्थितीवर व्यक्त केली चिंता

मॅककलमची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक शैलीत खेळताना दिसत आहे. ‘बॅझ’ हे मॅककलमचे टोपणनाव असल्याने इंग्लंडच्या आक्रमक शैलीतील खेळाला ‘बॅझबॉल’ असे संबोधले जात आहे. मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली, तर न्यूझीलंडमध्ये झालेली मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. मात्र, भारतीय संघाला मायदेशात नमवणे हे सर्वात अवघड आव्हान मानले जाते. पुढील वर्षी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडच्या संघाला या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. सर्वोत्तम संघांविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न असतो आणि घरच्या मैदानांवर भारतापेक्षा कोणताही संघ चांगली कामगिरी करत नाही. आमच्यासाठी हे मोठे आव्हान असेल. आम्ही यशस्वी ठरलो तर उत्तमच, पण अपयशी ठरलो तरी आम्ही आमची खेळण्याची शैली बदलणार नाही,’’ असे मॅककलमने सांगितले. तसेच या आक्रमक शैलीतील खेळाबाबत विचारले असता मॅककलम म्हणाला, ‘‘आम्ही क्रिकेट खेळतो कारण आमचे या खेळावर प्रेम आहे. यश मिळवताना तुम्ही खेळाचा आनंद घेणेही गरजेचे असते.’’