डॉ. प्रकाश परांजपे

छोटू, ज्ञानात भर पडायला पाहिजे असेल तर राधानाथ सरकारबद्दल माहिती शोध, स्टेमनची नको. स्टेमनचा कुठला डाव बघितलास म्हणतोस? आबा, ३ बदामचा ठेका नाही का खेळलात तुम्ही त्या दिवशी? आणि मेननकाकांच्या गळ्यात पडून तुम्ही ९ दस्त बनवलेत असं जाधवकाका म्हणाले. मेननकाका काय खवळले होते? छोटूने आबांना डावाची आठवण करून दिली.

मेननने ३ बदामाच्या ठेक्याविरुद्ध इस्पिक राणीची उतारी केली. उतारी बघून भातखंडे खूश झाला. त्याने पटापट इस्पिक एक्का-राजा वाजवून घेतले आणि तिसरं इस्पिक खेळला. भातखंडेचा हा झपाटा बघूनच खरं तर मेननच्या काळजात चर्र झालं होतं. घाईघाईत हा काहीतरी गोंधळ घालणार असंच मेननला वाटलं होतं. झालंही तसंच. इस्पिकची तिसरी फेरी गुलामाने जिंकून मेनन विचारात पडला, पण वेळ निघून गेलेली होती. चौथ्या दस्ताला मेनन एक छोटं बदामाचं पान खेळला. आबांनी तीन फेऱ्यात गावातले हुकूम काढले आणि एक्का-राजा-राणी या क्रमाने किलवरचे तीन दस्त वाजवून आबा बघ्याच्या हातात पोचले. बघ्याच्या हातातून ते मग एक छोटं चौकटचं पान खेळले आणि भातखंडेनं छोटं पान दिल्यावर हातातून दश्शी खेळले आणि मेननच्या गळ्यात पडले.

आता सगळ्यांकडे तीनच पानं उरली होती. आबांकडे बदाम दश्शी आणि चौकट एक्का-गुलाम; जाधवच्या हातात बदाम ९ आणि चौकटची दोन छोटी पानं; आणि मेननच्या हातात इस्पिक ९ आणि चौकट राजा—अठ्ठठी. मेनन चौकट खेळला असता तर आबांना आयतेच एक्का—गुलामांचे दोन दस्त मिळाले असते. म्हणून मेनन इस्पिक ९ खेळला. आबांनी बघ्याच्या हातात बदाम ९ ने मारती घेतली आणि हातातून चौकटचा गुलाम टाकला. शेवटचे दोन दस्त आबांचे चौकट एक्का आणि हुकुमाचा दश्शीचे झाले. अशा प्रकारे नऊ दस्त होऊन ३ बदामचा ठेका वटला.

भातखंडेने थोडा विचार केला असता तर तो आबांच्या या गळेपडू खेळीपासून मेननला उसंत देऊ शकला असता. त्याकरिता दुसऱ्या दस्ताला इस्पिक एक्का वाजवल्यानंतर चौकट खेळणं आवश्यक आहे. आबांच्या दश्शीवर मेनन चौकट राणी खेळून तो दस्त जिंकेल आणि इस्पिक गुलाम वाजवून घेईल. असे चार दस्त पदरात पाडून घेतल्यानंतर मेनन पाचव्या दस्ताला बदाम किंवा किलवर उतारी करेल. आता आबांनी काहीही केलं तरी मेननला चौकट राजाचा आणखीन एक दस्त त्यांना द्यावाच लागेल आणि ठेका एक दस्ताने बुडेल. वेळीच योग्य पान खेळून भिडूची अवघड प्रसंगापासून सुटका करणे हे ब्रिजच्या बचावाचं एक महत्त्वाचं तंत्र आहे. घाईघाईने खेळल्यामुळे भातखंडेला हा बचाव यावेळी साधला नाही आणि आबांनी त्याचा चांगला फायदा उठवला.

राधानाथ सरकार या गणित तज्ज्ञाने १८५०—५५ या सुमारास अहर्निश प्रयत्न करत हिमालय पर्वतातल्या एका शिखराची उंची अचूकपणे मोजली होती. पण १ बिहू वर २ किलवरची बोली जशी स्टेमन या नावाने रूढ झाली त्याचप्रमाणे हे अत्युच्च शिखर राधानाथ या नावाने नव्हे तर माउंट एव्हरेस्ट या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)