Sachin Tendulkar Quiz On Cricket: आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने बाऊंड्री लाईनजवळ पकडल्या जाणाऱ्या कॅचच्या नियमांत मोठा बदल केला आहे. ज्या कॅचमुळे भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली तो कॅच आता इथून पुढे अवैध ठरवला जाणार आहे. दरम्यान भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो बाऊंड्री लाईनवरील कॅचबाबत प्रश्न विचारताना दिसून येत आहे.

क्रिकेटमध्ये काही नियम फलंदाजांसाठी फायदेशीर आहेत, तर काही नियम गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरतात. नव्या नियमांनुसार फलंदाज दुखापतग्रस्त असेल, तर त्याला रनर दिला जात नाही. त्याऐवजी बदली खेळाडू म्हणून दुसऱ्या फलंदाजाला फलंदाजीची संधी दिली जाते. तर दुसरीकडे गोलंदाज फलंदाजांना काहीच मेहनत न करता मांकडिंग करून बाद करू शकतो.

एक असा नियम देखील आहे, ज्यामुळे फलंदाज नेहमीच अडचणीत येतात.अनेकदा गोलंदाज बाऊन्सर चेंडू टाकतात. जो फलंदाजांच्या हेल्मेटला जाऊन लागतो. कधी कधी चेंडू लागल्यामुळे फलंदाज यष्टीवर पडतात, तर कधी वेगवान चेंडूच्या माऱ्यामुळे हेल्मेट यष्टीवर जाऊन आधळतं. असं झाल्यास नियमानुसार फलंदाजाला बाद घोषित केलं जातं.

सचिन तेंडुलकरनेही असाच काहीसा प्रश्न विचारला आहे, जो तुम्हाला डोकं खाजवायला भाग पाडेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सचिनने विचारलंय,”जेव्हा एखादा फलंदाज फलंदाजी करत असतो आणि फलंदाजी करत असताना चेंडू हेल्मेटला लागला आणि हेल्मेट यष्टीवर आधळलं, तर त्याला बाद घोषित केलं जातं. ठीक आहे? मग जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने लाँग ऑनवर चेंडू पकडला, तो बाऊंड्रीलाईनच्या आत आहे, सर्व काही कायदेशीर आहे. पण कॅच घेतल्यानंतर त्याची टोपी बाऊंड्रीलाईनच्या पलीकडे पडली तर मग काय?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिनने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीणच आहे. पण नियम काय सांगतात ते समजून घ्या. जर क्षेत्ररक्षकाने बाऊंड्री लाईनच्या आत कॅच पकडला असेल आणि त्याच्या शरीराच्या कुठल्याही भागाचा बाऊंड्री लाईनशी कुठलाही संपर्क झाला नसेल, तर फलंदाजाला बाद घोषित करण्यात येईल. कारण नियम हा फक्त चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या शरीरीच्या भागाशी संबधित आहे. त्यामुळे फक्त कॅप नव्हे, तर इतर कुठलीही गोष्ट बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडली आणि क्षेत्ररक्षक आत असेल, तर त्याला बाद घोषित केलं जाईल.