पीटीआय, सिडनी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपुष्टात आल्याची चिन्हे असून आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियविरुद्धच्या निर्णायक पाचव्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात येणार असल्याचे समजते. फलंदाजीमध्ये आलेले सपशेल अपयश हे यामागचे प्रमुख कारण असले, तरी त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळत नसल्याने संघ व्यवस्थापनाला हा कठोर निर्णय घ्यायला लागल्याची माहिती आहे.

कसोटीच्या पूर्वसंध्येला, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहितच्या समावेशाबाबतच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे टाळले. एरवी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीरने ‘आम्ही खेळपट्टी पाहूनच अंतिम ११ खेळाडूंची निवड करू,’ असे सावध उत्तर दिले. या पत्रकार परिषदेला कर्णधार उपस्थितही नव्हता. त्यामुळे रोहितला वगळले जाईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आणखी एका वृत्तानुसार रोहितने स्वत:हूनच या सामन्यात संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. याविषयी त्याने गंभीरशी चर्चा केली आणि परस्परसंमतीतून रोहितला ‘विश्रांती’ देण्याविषयी ठरले.

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय! शेवटच्या कसोटीत स्वत: घेतली विश्रांती, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी

मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीच्या अखेरच्या सत्रात सात गडी गमावत भारताने ऑस्ट्रेलियाला सामना बहाल केल्यापासूनच रोहितच्या भवितव्याबाबतची चर्चा रंगत होती. रोहितला या मालिकेतील तीन सामन्यांच्या पाच डावांत केवळ ३१ धावा करता आल्या आहेत. दोन सामन्यांत मधल्या फळीत खेळून निराशा केल्यानंतर रोहितने मेलबर्न कसोटीसाठी सलामीला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो तेथेही तो अपयशी ठरला. दोन्ही डावांत त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तसेच त्याला सलामीला खेळता यावे यासाठी लयीत असलेल्या केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळविण्यात आले आणि शुभमन गिलला संघाबाहेर करण्यात आले. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती. त्यातच फलंदाजांच्या बेजबाबदार खेळावर प्रशिक्षक गंभीर प्रचंड नाराज असल्याचेही बोलले जात असून त्यामुळेच निर्णायक कसोटीसाठी संघनिवड करताना कठोर निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?

कर्णधाराची सुमार कामगिरी

●सप्टेंबर २०२४ पासून बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळून खेळलेल्या आठ कसोटींच्या १५ डावांत रोहितला केवळ एकदा अर्धशतकी मजल मारता आली आहे.

●यापैकी दोनच डावांत तो २० धावांचा टप्पा ओलांडू शकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने अवघ्या ६.२० च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

Story img Loader