पॅरिस : यंदाच्या हंगामात सातत्य राखण्याच्या आव्हानाचा सामना करणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटूंचा २५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील मार्ग अडथळ्याचा राहणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी कार्यक्रमपत्रिका काढण्यात आली, तेव्हा भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर सुरुवातीपासून कठीण आव्हान राहणार आहे. पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनची पहिल्याच फेरीत जागितक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या शी यू क्यू याच्याशी गाठ पडणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर लक्ष्यला पूर्ण हंगामात संघर्षाचाच सामना करावा लागला आहे. लक्ष्य सध्या जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर आहे.

एकेरीतील दुसरा खेळाडू एचएस प्रणॉयला पहिल्या फेरीत फिनलँडच्या जोकिम ओलडॉर्फ या दुबळ्या प्रतिस्पर्ध्याशी खेळायचे आहे. अर्थात, हा अडथळा पार केल्यावर दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनचे आव्हान असू शकते.महिला एकेरीत पीव्ही सिंधूलादेखील पहिल्या फेरीत आव्हान नसेल. तिची गाठ बल्गेरियाच्या कालोयाना नालबांटोवाविरुद्ध होईल. पण, दुसऱ्या फेरीत तिला जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या वांग झी यी हिचे आव्हान अपेक्षित आहे.

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल आहे. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्या हरिहरन अम्साकारुनन-रुबेन कुमार किंवा तैवानच्या लिऊ कुआंग हेंग- यांग पो हान यांच्यातील विजेत्याशी होईल. भारतीय जोडीची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्या आरोन चिया-सोह वुई यिक यांचे आव्हान असू शकते. अर्थात, आतापर्यंत भारतीय जोडीने या जोडीविरुद्ध झालेल्या १४ पैकी ११ लढतींत विजय मिळविला आहे.