पीटीआय, नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच माजी फुटबॉलपटू हा अध्यक्ष झाला आहे. माजी गोलरक्षक कल्याण चौबे हे माजी आक्रमक बायच्युंग भूतियाला नमवून अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. ४५ वर्षीय चौबे यांनी अपेक्षेप्रमाणेच माजी कर्णधार भूतियाला ३३-१ असे सहज नामोहरम केले. राज्य संघटनांच्या ३४ प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या मतदान यादीत भूतियाला पाठबळ मिळाले नाही. भूतियाच्या उमेदवारी अर्जावर कोसाराजू यांनी प्रस्तावित आणि मानवेंद्र यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती.

कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाच्या जागेसाठी राजस्थान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष मानवेंद्र सिंग यांना २९-५ असे पराभूत केले. कोषाध्यक्षपदासाठी अरुणाचल प्रदेशच्या किपा अजय यांनी आंध्र प्रदेशच्या गोपाळकृष्ण कोसाराजू यांचा ३२-१ असा दणदणीत पराभव केला. एक मत ग्राह्य धरण्यात आले नाही. भूतिया, आयएम विजयन, शब्बीर अली आणि क्लायमॅक्स लॉरेन्स यांना कार्यकारिणी समितीत खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून स्थान देण्यात आले आहे.

कार्यकारिणी समिती सदस्यांच्या १४ जागांसाठी तितकेच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. यात जीपी पाल्गुना, अविजित पॉल, पी अनिलकुमार, वलंका नताशा आलेमाओ, मालोजी राजे छत्रपती, मेनला इथेंपा, मोहन लाल, आरिफ अली, के नेबू सेखोसे, लालनिघगलोवा हमर, दीपक शर्मा, विजय बाली आणि सय्यद इम्तियाज हुसैन यांचा समावेश आहे.

भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीने नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यामुळे माजी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची सत्ता अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. डिसेंबर २०२०मधील अपेक्षित निवडणूक न घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पटेल यांची हकालपट्टी करीत प्रशासकीय समितीकडे कारभार सोपवला होता. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ म्हणजेच ‘फिफा’ने भारतावर बंदीची कारवाई केली. यानंतर न्यायालयानेच प्रशासकीय समिती बरखास्त करीत ‘फिफा’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्याने बंदी मागे घेण्यात आली.

संघसहकारी ते प्रतिस्पर्धी!

‘सिक्किमीज स्निपर’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ४५ वर्षीय भूतियाने आंतरराष्ट्रीय नकाशावर भारतीय फुटबॉल क्षेत्राला ओळख निर्माण करून दिली. भूतिया रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीने जगभराचे लक्ष वेधले होते. दुसरीकडे, चौबे हे भारतीय जनता पक्षाचे नेते. पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदारसंघातून ते गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. याचप्रमाणे भारताच्या वरिष्ठ संघाचेही ते अनेकदा सदस्य होते. परंतु प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. परंतु वयोगटांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी भारतचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच देशातील क्लब फुटबॉलमधील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मोहन बागान आणि ईस्ट बेंगालचे ते माजी गोलरक्षक होते. विशेष म्हणजे भूतिया आणि चौबे हे एके काळचे ईस्ट बेंगालचे संघसहकारी होते.

कल्याण यांचे अभिनंदन! ते भारतीय फुटबॉल पुढे नेतील, अशी आशा आहे. मीसुद्धा भारताच्या फुटबॉल क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत राहीन. मला पाठबळ देणाऱ्या देशातील फुटबॉलचाहत्यांचा मी आभारी आहे. मी निवडणुकीच्या आधीसुद्धा फुटबॉल खेळासाठी जितके प्रयत्न केले, तितकेच नंतरसुद्धा करीन. मी कार्यकारिणी समितीत असेन.

-बायच्युंग भूतिया