पेनल्टी शुटआऊटमध्ये एडन हजार्डची संधी हुकली; स्टोक सिटी उपांत्यपूर्व फेरीत
गतविजेत्या चेल्सीला बुधवारी कॅपिटल वन चषक फुटबॉल स्पध्रेतून गाशा गुंडाळावा लागला. स्टोक सिटीविरुद्धच्या लढतीत पेनल्टी शुटआऊटमध्ये एडन हजार्डला गोल करण्यात अपयश आले आणि चेल्सीचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. निर्धारित वेळेत १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागल्यानंतर स्टोकने पेनल्टी शुटआऊटमध्ये ५-४ अशी बाजी मारली आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या आर्सेनललाही धक्कादायक पराभवाचा धक्का बसला.
चेल्सी आणि स्टोक यांच्यातील सामन्यात पहिले सत्र गोलशून्य राहिले. ५२व्या मिनिटाला जॉनथन वॉल्टरने स्टोकचे खाते उघडले. ग्लेन व्हेलनच्या पासवर वॉल्टरने गोल करून स्टोकला १-० अशी आघाडी मिळवून दिली. निर्धारित ९० मिनिटांत ही आघाडी कायम राखून स्टोकने विजय जवळपास निश्चित केला होता, परंतु अतिरिक्त वेळेत लॉईस रेमीने गोल करून सामना १-१ अशी चेल्सीला बरोबरी करून दिली. रेमीच्या या गोलने सामन्याचा कालावधी आणखी ३० मिनिटांनी वाढवण्यात आला. त्यात दोन्ही संघांनी बचावफळी भक्कम करून एकमेकांना गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्याने सर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचवली. स्टोककडून चार्ली अॅडम, ऑस्कर, झेरडॅन शकिरी, मार्क विल्सन व मार्को अर्नाउटोव्हिक यांनी गोल केले. चेल्सीकडूनही विलियम, पीटर ऑडेमविंगी, रेमी व कुर्ट झोउमा यांनी गोल केल्याने सामन्याची स्थिती ५-४ अशी होती. चेल्सीकडून अखेरच्या संधीवर गोल करण्याकरिता आलेल्या अनुभवी हजार्डला मात्र अपयश आले आणि स्टोकने ५-४ असा विजय निश्चित केला.
दुसऱ्या सामन्यात शेफिल्ड वेन्सडे क्लबने ३-० अशा फरकाने आर्सेनलला नमवले. रॉस व्ॉलॅक (२७ मि.), लुकास जोओ (४० मि.) आणि सॅम हॅटचिन्सन (५१ मि.) यांनी शेफिल्डसाठी प्रत्येकी एक गोल केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
गतविजेत्या चेल्सीचे आव्हान संपुष्टात
गतविजेत्या चेल्सीला बुधवारी कॅपिटल वन चषक फुटबॉल स्पध्रेतून गाशा गुंडाळावा लागला.
Written by रत्नाकर पवार
First published on: 29-10-2015 at 07:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chelsea football club lost the match