युरोपियन चषक विजेत्या चेल्सीने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात बसेल फुटबॉल क्लबचा ३-१ असा पराभव करून युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्कर काडरेझो याने केलेल्या दोन गोलांच्या बळावर बेनफिकाने फेनेरबेस संघाला ३-१ असे नमवत अंतिम फेरी गाठली आहे. आता चेल्सी आणि बेनफिका जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.
गेल्या आठवडय़ात चेल्सीने २-१ असा विजय मिळवून बसेलवर एका गोलाची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस मोहम्मद सालाह याने गोल करत बसेलला बरोबरी साधून दिली. मात्र दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या अंतराने तीन गोल करत चेल्सीने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. फर्नाडो टोरेस, विक्टर मोझेस आणि डेव्हिड लुइझ यांनी हे गोल झळकावले. चेल्सीने ५-२ अशा गोलफरकाच्या आधारावर आगेकूच केली.
गेल्या आठवडय़ात फेनेरबेसने १-० असा विजय मिळवल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. पण नवव्या मिनिटाला निकोलस गैटानच्या गोलमुळे बेनफिकाने बरोबरी साधली.
पोर्तुगालच्या डिर्क कुयटने २३व्या मिनिटाला गोल करून फेनेरबेसला पुन्हा आघाडीवर आणले. अखेर ऑस्कर काडरेझोने ३५व्या आणि ६६व्या मिनिटाला दोन गोल लगावत बेनफिकाला अंतिम फेरीची वाट मोकळी करून दिली. बेनफिकाने ३-२ अशा गोलफरकानुसार अंतिम फेरीत स्थान मिळवले.