पीटीआय, चेन्नई : चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे केंद्र असलेल्या हयात रिजन्सी हॉटेलमध्ये आग लागल्याने स्पर्धा एक दिवस पुढे ढकलणे आयोजकांना भाग पडले आहे. ही स्पर्धा बुधवारी सुरू होणे नियोजित होते. मात्र, आता लढतींना आज, गुरुवारपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराथी या भारतीयांसह अनेक आघाडीच्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे.

‘‘चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेचे आयोजन स्थळ असलेल्या हॉटेल हयात रिजन्सीमध्ये मंगळवारी रात्री आग लागली. सर्व खेळाडू सुरक्षित असून त्यांना नजीकच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. तसेच स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे,’’ असे भारतीय ग्रँडमास्टर आणि स्पर्धा संचालक श्रीनाथ नारायणनने ‘एक्स’वर लिहिले.

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये मध्यरात्री नवव्या मजल्यावर आग लागली. त्यामुळे संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला होता. त्यामुळेच सर्वांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले. खेळाडू हॉटेलमध्ये परतले असून पूर्ण सुरक्षा चाचणी झाल्यानंतरच स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे.

चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेत एक कोटी रुपयांचे पारितोषिक असून एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या भारताच्या अर्जुन एरिगेसीला स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे. तो आपल्या मोहिमेची सुरुवात अमेरिकेच्या अवॉन्डर लियांगविरुद्ध करेल. ठरलेल्या वेळीच सांगता चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेची सुरुवात एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली असली, तरी स्पर्धा १५ ऑगस्टलाच संपेल. यापूर्वीच्या कार्यक्रमानुसार, ११ ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस होता. मात्र, आता ११ ऑगस्टलाही सामने घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळीच स्पर्धेची सांगता होऊ शकेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.