चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱ्या विजेतेपदासाठी मी खूप उत्सुक होतो. मात्र पोटाच्या आकस्मिक दुखण्यामुळे मला माघार घ्यावी लागली, असे गतविजेता टेनिसपटू मिखाईल यॉझनी याने सांगितले.
रशियाच्या यॉझनीने इस्रायलच्या डय़ुड सेला याच्याविरुद्धच्या सामन्यातून  माघार घेतली. पहिल्या फेरीच्या या सामन्यात त्या वेळी सेलाकडे ३-१ अशी आघाडी होती. माघार घेण्याच्या निर्णयाबाबत यॉझनी म्हणाला, ‘‘सुरुवातीला मी परतीचे फटके मारू शकत होतो. मात्र पोटातील दुखणे असह्य़ झाल्यामुळे आपल्याला खेळता येणे शक्य नाही, याची जाणीव मला झाली. त्यामुळेच मी नाइलाजास्तव माघार घेतली. गेल्या आठवडय़ापासूनच मला हा त्रास होत आहे. चेन्नईत पुन्हा खेळण्यासाठी मी पोटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले होते. अर्थात पुन्हा या स्पर्धेत मी निश्चित येईन.’’ दरम्यान, फ्रान्सच्या रॉजर व्हॅसेलिनने चेक प्रजासत्ताकच्या जिरी व्हॅसेली याचे आव्हान ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले.