बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : गतविजेत्या भारताचा पराभव

भारतीय संघाने साखळी लढतींपाठोपाठ बाद फेरीच्या पहिल्या लढतीतही चांगली कामगिरी करताना युक्रेनवर मात केली होती.

अमेरिकेविरुद्ध उपांत्य सामन्यात बरोबरीची कोंडी फोडण्यात अपयश

संयुक्त गतविजेत्या भारताला ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. दोन डावांनंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या निर्णायक अतिजलद (ब्लिड्झ) लढतीत अमेरिकेने भारताला ४.५-१.५ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे भारतीय बुद्धिबळ संघांचे यंदा जेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

भारतीय संघाने साखळी लढतींपाठोपाठ बाद फेरीच्या पहिल्या लढतीतही चांगली कामगिरी करताना युक्रेनवर मात केली होती. त्यामुळे या संघाकडून जेतेपदाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात भारताने अमेरिकेला ५-१ अशी धूळ चारली होती. परंतु, अमेरिकेने प्रत्युत्तर देताना दुसरा डाव ४-२ असा जिंकत लढतीत बरोबरी साधली. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या अतिजलद लढतीत भारताचे पी. हरिकृष्णा, बी. अधिबन, कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली हे बुद्धिबळपटू पराभूत झाले. तर निहाल सरिनचा सामना बरोबरीत सुटला. केवळ द्रोणावल्ली हरिकाने कामगिरीत सातत्य राखताना दोन्ही डावांनंतर अतिजलद डावातही विजय संपादला.

त्याआधी, उपांत्य फेरीच्या पहिल्या डावात भारतीय बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट खेळ केला. या डावात पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने जेफ्री जिओंगचा, पी. हरिकृष्णाने डारिऊस स्विर्कझचा, द्रोणावल्ली हरिकाने अ‍ॅना झातोन्सकीचा आणि आर. वैशालीने थालिआचा पराभव केला. कोनेरू हम्पी आणि निहाल सरिन यांचे सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे भारताने पहिला डाव ५-१ असा जिंकला.

दुसऱ्या डावात मात्र अमेरिकेने भारताला धक्के दिले. आनंदला २० वर्षीय ग्रँडमास्टर जिओंगने पराभूत केले. विदित गुजराथी आणि पद्मानंद यांनाही पराभव पत्करावा लागला. तर हम्पी आणि वैशाली यांचे सामने बरोबरीत सुटले. केवळ हरिकाला विजयाची नोंद करता आली.

अमेरिका-रशिया आज आमनेसामने

गतवर्षी भारतासह संयुक्त विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाने यंदाही ऑलिम्पियाड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रशियाने दोन डावांच्या उपांत्य फेरीत चीनचा ३.५-२.५ आणि ४-२ असा पराभव केला. रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्तेनियुक आणि आंद्रे एसीपेन्को यांना दोन्ही डावांतील आपापले सामने जिंकण्यात यश आले. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत रशिया आणि अमेरिका आमनेसामने येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chess olympiad defeat of previous winners india akp

ताज्या बातम्या