वृत्तसंस्था, चेन्नई : भारताच्या सहाही संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवताना रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारताच्या ‘अ’ संघाने ग्रीसवर ३-१ अशी मात केली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला. तसेच युवा अर्जुन इरिगेसीने अथानासिओस मास्ट्रोवासिलिसला ५१ चालींमध्ये नमवले. विदित गुजराथी आणि के. शशिकिरण यांना मात्र बरोबरीवर समाधान मानावे लागले.
भारताच्या ‘ब’ संघाने सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्याला ४-० अशा फरकाने नमवण्याची कामगिरी केली. त्यांनी स्वित्र्झलडचा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून डी. गुकेश, निहाल सरिन, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या युवकांनी आपापले सामने जिंकले. यापैकी सरिनने सेबॅस्टियन बोग्नरला केवळ २७ चालींमध्येच पराभूत केले. भारताच्या ‘क’ संघाने आइसलँडवर ३-१ अशी मात केली. एस. पी. सेतुरामन आणि अभिजित गुप्ता यांना विजय मिळवण्यात यश आले. मात्र, सूर्यशेखर गांगुली आणि अभिमन्यू पुराणिक यांना संघर्षांनंतरही बरोबरीवर समाधान मानावे लागले.
महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाने इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला. द्रोणावल्ली हरिकाला योव्हांका हौस्काने बरोबरीत रोखले. मात्र, आर. वैशाली आणि अनुभवी भक्ती कुलकर्णीने मिळवलेले विजय निर्णायक ठरले. तानिया सचदेवची लढत बरोबरीत सुटली. भारताच्या ‘ब’ संघाने इंडोनेशियाला, तर ‘क’ संघाने ऑस्ट्रियाला नमवले. ‘ब’ संघातील वंतिका अगरवाल आणि सौम्या स्वामीनाथन यांना विजय मिळवण्यात यश आले. ‘क’ संघातील पी. व्ही. नंधिधा आणि प्रत्युशा बोड्डा यांनी आपापले सामने जिंकले.