Cheteshwar Pujara 100th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतला दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या नागपूर कसोटीत भारताने कांगारूंवर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेतली आपली आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतला हा सामना भारताचा मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी खास असणार आहे. कारण हा त्याच्या कारकीर्दीतला १०० वा कसोटी सामना असणार आहे. अशी कामगिरी करणारा तो १३ वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.

चेतेश्वर पुजाराकडे १०० व्या कसोटी सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. कारण आतापर्यंत १२ भारतीय खेळाडूंनी १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. परंतु त्यापैकी कोणत्याही खेळाडूला शतक झळकावता आलेलं नाही. कपिल देव, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सहवाग, राहुल द्रविड यांच्यासाठी १०० कसोटी अनलकी ठरली आहे. यापैकी काही खेळाडूंनी अर्धशतक झळकावलं होतं. परंतु कोणत्याही खेळाडूला १०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

पुजाराकडे इतिहास बदलण्याची संधी

वैयक्तिक शंभराव्या कसोटी सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण (६४ आणि ४ धावा) कपिल देव (५५ धावा) सचिन तेंडुलकर (५४ धावा) राहुल द्रविड (५२ आणि ९ धावा) मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले आहेत. आता पुजाराकडे इतिहास बदलण्याची संधी आहे.

हे ही वाचा >> Chetan Sharma Salary : चेतन शर्मांना BCCI देतं इतका पगार, स्टिंग ऑपरेशनमुळे होणार कोट्यवधींचं नुकसान

९ खेळाडूंचं शंभराव्या कसोटीत शतक, दोघांचं द्विशतक

शंभराव्या कसोटी सामन्यात शतक ठोकण्याबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत ९ खेळाडूंनी ही किमया केली आहे. परंतु या यादीत एकही भारतीय खेळाडू नाही. या यादीत इंग्लंडचे ३, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी २-२ फलंदाज आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने १०० व्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतकं ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडच्या जो रूटने शंभराव्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara can make history no indian scored century in 100th test asc
First published on: 15-02-2023 at 14:33 IST