खेळाडू म्हणून सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या कसोटीपटू चेतेश्वर पुजाराचा वेगळ्या भूमिकेतून खेळासाठी योगदान देत राहण्याचा मानस आहे. भविष्यात प्रशिक्षकपद भूषविण्याचीही आपली तयारी असल्याचे पुजाराने नमूद केले आहे.

तंत्रशुद्ध फलंदाजी आणि भक्कम बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने १०३ कसोटी सामने खेळताना सात हजारहून अधिक धावा केल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर पुजाराने खेळाडू म्हणून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान पुजाराने समालोचन केले. भविष्यात यासह अन्यही भूमिका बजावण्यास आपल्याला आवडेल असे पुजाराने सांगितले.

‘‘मला समालोचन करताना खूप मजा आली. यापुढेही मी समालोचकाच्या भूमिकेत दिसत राहीन यात शंका नाही. तसेच प्रशिक्षकपद किंवा ‘बीसीसीआय’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये काम करण्याबाबत विचारणा झाल्यास माझी त्यासाठी नक्कीच ‘ना’ नसेल,’’ असे पुजारा म्हणाला.
‘‘मी अद्याप प्रशिक्षकपदाबाबत विचार केलेला नाही. मात्र, तशी संधी चालून आली, तर मी त्या वेळीच योग्य तो निर्णय घेईन. मला खेळाला योगदान देत राहायचे आहे, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला माझ्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होणार असेल, तर कोणतीही भूमिका बजाविण्याची माझी तयारी आहे,’’ असे पुजाराने नमूद केले.

आता ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या जमान्यात पुजारासारख्या खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या फलंदाजांची संख्या कमी होत चालली आहे. कसोटी क्रिकेटसाठी ही चिंताजनक बाब आहे का असे विचारले असता, ‘‘आताच्या काळातही पारंपरिक पद्धतीने खेळणारे फलंदाज संघाला हवे असतात. आता खेळात बरेच बदल झाले आहेत यात शंका नाही. तुम्ही या बदलांशी जुळवून घ्यायला हवे,’’ असे उत्तर पुजाराने दिले.

‘‘आता केवळ कसोटीवर लक्ष केंद्रित करून चालत नाही. खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवायची असल्यास तुम्ही तिन्ही प्रारूपांबाबत विचार केला पाहिजे. अनेकदा एकदिवसीय, ट्वेन्टी-२० किंवा ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची कसोटी संघात निवड होते. त्यामुळे तुम्ही सर्व प्रारूपांना सारखेच महत्त्व दिले पाहिजे,’’ असा सल्ला पुजाराने युवा खेळाडूंना दिला.

वारसदार कोण?

राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकासाठी पुजाराला पसंती देण्यात आली आणि त्याने या संधीचे सोने केले. मात्र, पुजारा संघाबाहेर झाल्यापासून भारताला तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी ठरू शकेल असा फलंदाज सापडलेला नाही. या क्रमांकासाठी कोण योग्य दावेदार वाटतात असे विचारले असता, ‘‘भारतीय संघात बरेच युवा, प्रतिभावान फलंदाज आहेत. साई सुदर्शनने कारकीर्दीची सुरुवात चांगली केली आहे. तसेच करुण नायरनेही इंग्लंडविरुद्ध अर्धशतक साकारले, पण त्यावेळी तो पाचव्या क्रमाकांवर खेळला होता. भविष्याचा विचार करता साई आणि करुण तिसऱ्या क्रमांकासाठी मुख्य दावेदार असू शकतील असा माझा अंदाज आहे,’’ असे पुजारा म्हणाला.