विश्वचषकात उपांत्य फेरीमध्येच गाशा गुंडाळायला लागलेल्या टीम इंडियात चौथ्या क्रमांकावरील खेळाडूबाबत अद्यापही संभ्रम आहे. याचा फटका भारतीय संघाला विश्वचषकात बसल्याचंही स्पष्ट झालं. विश्वचषकातील पराभवानंतर सध्या भारतीय संघात आणि संघ व्यवस्थापनेत बदल होणार असल्याची चर्चा आहे. अशातच भारताच्या कसोटी संघातील हुकमी फलंदाज चेतेश्वर पुजाराने माझ्यात क्रिकेटच्या छोट्या प्रकारात किंवा निर्धारीत षटकांच्या सामन्यातही खेळण्याची क्षमता असल्याचं विधान केलं आहे.

लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात सर्वाधिक चौकारांच्या निकषाच्या आधारे इंग्लंडला विजयी आणि न्यूझीलंडला पराभूत घोषीत करणं हे काहीसं चुकीचं वाटतंय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात असं कधीही घडलं नव्हतं. अंतिम सामन्यात जर कुणीच पराभूत झालं नाही तर दोन्ही संघांमध्ये संयुक्तपणे चषक द्यायला हवा होता, असं मला वाटतं. पण अखेर आयसीसी निर्णय घेत असते, असं चेतेश्वर पुजारा म्हणाला. भारताच्या विश्वचषक संघात सहभागी व्हायला नक्कीच आवडलं असतं पण तो आता भूतकाळ आहे. मी आता भविष्यातील संधीबाबत विचार करतोय. वेस्ट इंडिजविरोधात चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसंच उपांत्य सामन्यातील पराभवातून भारतीय संघ धडा घेईल असं पुजारा म्हणाला.

क्रिकेटच्या वनडे आणि टी-20 सारख्या छोट्या प्रकारात संघात स्थान मिळवू शकतो का असं प्रश्न पुजाराला विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ‘नक्कीच मी कसोटी सामन्यांमध्ये चांगलं प्रदर्शन करतोय, त्यामुळे छोट्या प्रकारातही खेळण्याची माझ्यात क्षमता आहे. वनडे आणि टी-20 साठी मी माझ्या खेळात काही बदल केला असून त्याचा चांगला परिणाम देखील स्थानीक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाला, त्यामुळे नक्कीच मला क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळायला आवडेल’, असं पुजारा म्हणाला. पुजाराच्या या विधानानंतर आतातरी भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय अथवा टी-20 संघात पुजाराची निवड होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.