डोकलाम प्रश्नावरुन भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेला तणाव काही दिवसांपूर्वीच निवळला. मात्र छोट्या छोट्या कारणांवरुन चीन आपला रडीचा डाव अजुनही खेळतच असल्याचं समोर येतंय. १०१ वर्षाच्या भारतीय महिला धावपटू मान कौर यांना चीनमध्ये होणाऱ्या Asian Masters Athletics Championship स्पर्धेसाठी व्हिसा नाकारण्यात आला आहे. १०१ वर्षाच्या कौर या चंदीगडच्या रहिवासी आहेत. नुकत्याच झालेल्या World Masters Games स्पर्धेत १०० मीटर स्पर्धेत कौर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.
चीनमध्ये होणाऱ्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी मान कौर सध्या पंजाबमध्ये सराव करत होत्या. मात्र व्हिसा नाकारल्याने आपल्याला मोठा धक्का बसल्याचं कौर यांनी बोलून दाखवलं. चिनी दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार, कौर यांच्याकडे स्पर्धेसाठीचं खासगी निमंत्रण नसल्यामुळे त्यांना व्हिसा देता येणं शक्य नाहीये. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कौर यांनी Indian Masters Athletics Association ने दिलेलं अधिकृत पत्रही चिनी दुतावासातील अधिकाऱ्यांना दाखवलं, मात्र व्हिसासाठी ते ग्राह्य धरण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
या निर्णयावर कौर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. चीनमध्ये लोकं फिरायला जात नाहीत का? त्यांना प्रत्येक वेळा परवानगीची गरज असते का? १०१ वर्षाची खेळाडू स्पर्धेत भाग घेण्याव्यतिरीक्त कोणती समस्या निर्माण करणार आहे, असा सवाल कौर यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. मात्र या निर्णयामुळे आपण अजिबात खचून जाणार नाही. सराव कायम ठेवत आगामी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याचा निर्धार कौर यांनी व्यक्त केलाय.
वयाच्या ९३ व्या वर्षी कौर यांनी अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, भालाफेक सारख्या स्पर्धांमध्ये कौर सहभाग नोंदवणार होत्या. याप्रकरणी चिनी दुतावासातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलायला नकार दिलाय.