चिराग शेट्टी, भारताचा बॅडमिंटनपटू

ऋषिकेश बामणे

गेल्या वर्षभरात पुरुष दुहेरीत आमची कामगिरी कौतुकास्पद झाली असली, तरी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी आम्हाला स्पर्धाची निवड करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा पुरुष दुहेरीतील आघाडीचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीने व्यक्त केली.

२२ वर्षीय चिरागच्या सातत्यपूर्ण खेळानंतरही पुणे ७ एसर्स संघाला प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) यंदाच्या हंगामात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय चिरागचा सहकारी सात्त्विकला चेन्नई सुपरस्टार्सचे प्रतिनिधित्व करताना पुन्हा एकदा दुखापतीने ग्रासले. त्यामुळे भारताच्या या जोडीसाठी पुढील काही काळ खडतर असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिरागशी केलेली ही खास बातचीत-

* ‘पीबीएल’मधील वैयक्तिक तसेच पुणे संघाच्या कामगिरीवर समाधानी आहेस का?

गतविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्सविरुद्ध निश्चितच आम्हाला अधिक चांगली कामगिरी करून अंतिम फेरी गाठता आली असती. परंतु गेल्या वर्षांच्या तुलनेत पुण्याने नक्कीच उत्तम खेळ केला. वैयक्तिक कामगिरीबाबतही मी समाधानी आहे. विशेषत: विदेशातील खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव आगामी स्पर्धासाठी मला फार लाभदायक ठरेल.

* ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी सुरू आहे?

प्रत्येक स्पर्धा खेळताना ऑलिम्पिकचा विचार मनात सुरू असतोच. परंतु सात्त्विकच्या पायाला पुन्हा दुखापत झाल्याने यापुढे स्पर्धाची निवड करताना आम्हाला अधिक सावधानता बाळगावी लागणार आहे. पुढील आठवडय़ापासून मनिला (फिलिपिन्स) येथे रंगणाऱ्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतूनसुद्धा त्याने माघार घेतली आहे. किमान २-३ आठवडे तो खेळू शकणार नसल्याने माझ्यासह एकेरीतील कोणता खेळाडू खेळेल, हेसुद्धा अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र ऑलिम्पिकपूर्वी आम्हा दोघांचेही मुख्य लक्ष्य ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा असून त्यापूर्वीच्या अनेक स्पर्धा महत्त्वाच्या असल्या तरी नाइलाजास्तव आम्हाला त्या टाळाव्या लागणार आहेत. त्याशिवाय आशियाई स्पर्धेतून ‘करोना’ आजाराच्या भीतीमुळे भारताच्या महिला संघाने माघार घेतल्याचे माझ्या कानावर आले. त्यामुळे आता पुरुष संघाबाबत व्यवस्थापक काय निर्णय घेतील, यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे.

* दुहेरीमध्ये हेंड्रा सेतिवानसोबत खेळताना स्वत:च्या खेळात कशा प्रकारे बदल केलेस?

जागतिक बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत इंडोनेशियाचे हेंड्रा सेतिवान आणि मोहम्मद अहसान दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे हेंड्राच्या साथीने खेळताना मला माझ्या खेळात फारशी तडजोड करावी लागली नाही. त्याचे परतीचे फटके खेळण्याची क्षमता पाहून मीसुद्धा अनेकदा आश्चर्यचकित व्हायचो. सात्त्विकच्या साथीने खेळताना साधारणपणे मी अधिक आक्रमक खेळतो. परंतु हेंड्रासह खेळताना मला आक्रमण करण्याची फारशी गरज भासली नाही. मात्र हेंड्राकडून मिळालेल्या शिकवणी आणि सल्ल्यांचा मला तसेच सात्त्विकलाही फार लाभ होईल.

* सततच्या स्पर्धादरम्यान फावल्या वेळेचा कसा उपयोग करतोस?

प्रत्येक आठवडय़ाला आम्ही किमान एक स्पर्धा खेळतो. मात्र दर तीन-चार स्पर्धानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दोघेही ठरवून एखाद्या स्पर्धेतून विश्रांती घेतो. यादरम्यान मी विशेषत: कुटुंबीयांसह वेळ घालवण्याला प्राधान्य देतो. त्याशिवाय मला टेनिसचे सामने पाहण्याची तसेच खेळण्याचीही आवड असल्याने त्यानुसार स्वत:चा छंद जोपासतो. त्याचप्रमाणे शक्य होईल, तेव्हा संगीताचा आनंद लुटण्याचा आणि स्वादिष्ट पण शरीरासाठी पौष्टिक आहारावर ताव मारण्याची संधीही मी सोडत नाही.