काही महिन्यांपूर्वी संघाप्रति निष्ठेचा अतुलनीय वस्तुपाठ सादर करणाऱ्या इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या कसोटीत इंग्लंडचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता. दुखापतीमुळे ख्रिस वोक्सच्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं. मात्र या स्थितीतही त्याने बॅटिंगला येण्याचा निर्णय घेतला. अतीव वेदना होत असतानाही वोक्सने गस अटकिन्सनला साथ दिली. या दोघांनी इंग्लंडला जिंकून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र अटकिन्सन बाद झाला आणि यजमानांचं स्वप्न धुळीस मिळालं. अवघड स्थितीतही संघासाठी खेळायला उतरणाऱ्या वोक्सचं चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं. काही दिवसांपूर्वीच अॅशेस मालिकेसाठी संघ जाहीर केला. ३६ वर्षीय वोक्सची या दौऱ्यासाठी निवड झाली नाही. यानंतर वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीपश्चात काऊंटी क्रिकेट तसंच जगभरात सुरू असलेल्या विविध टी२० लीगमध्ये खेळणार असल्याचं वोक्सने स्पष्ट केलं.
वोक्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिलं की, माझ्या मते थांबण्याची ही योग्य वेळ आहे. क्रिकेट समजू लागल्यापासून इंग्लंडसाठी खेळणं हे माझं स्वप्न होतं. इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारात खेळता आलं हा माझा मोठा बहुमान आहे. गेली १५ वर्ष इंग्लंडचं प्रतिनिधित्व करता येणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद होतं. या वाटचालीत अनेक सहकारी आयुष्यभराचे मित्र झाले. मी मागे वळून पाहीन तेव्हा मला या प्रवासाचं अप्रूप वाटेल. २०११ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केलं तो क्षण अगदी आताच घडून गेला असं वाटत आहे. वर्ल्डकपविजेत्या दोन संघांचा भाग होतो यापेक्षा आनंददायी गोष्ट असू शकत नाही. अॅशेस मालिकेत इंग्लंडसाठी खेळू शकलो. माझे आईवडील, पत्नी, मुलं आणि चाहते यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ही वाटचाल करू शकलो. बार्मी आर्मीचे खास आभार मानू इच्छितो कारण ते नेहमीच इंग्लंड संघाच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. माझे कर्णधार, संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्याशिवाय हा टप्पा गाठणं शक्य नव्हतं.
वोक्सने ६२ कसोटी, १२२ वनडे आणि ३३ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरणात वोक्सच्या गोलंदाजीसमोर खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडत असे. २०१९ वनडे वर्ल्डकप आणि २०२२ टी२० वर्ल्डकप विजेत्या इंग्लंड संघाचा वोक्स अविभाज्य भाग होता. २०१८ मध्ये क्रिकेटचं माहेरघर असणाऱ्या लॉर्ड्सवर वोक्सने अफलातून शतक झळकावलं होतं. याबरोबरीने ४ विकेट्सही पटकावल्या होत्या. वोक्समुळेच सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने झुकलं आणि यजमानांनी एक डाव आणि १५९ धावांनी विजय मिळवला होता. वोक्सलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
आयपीएल स्पर्धेत वोक्सने पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांचं प्रतिनिधित्व केलं मात्र दुखापतींमुळे त्याला कोणत्याच संघासाठी नियमित खेळता आलं नाही.
भारताविरूद्ध कसोटी मालिकेत निखळलेल्या खांद्यांसह केली होती बॅटिंग
ऑगस्ट महिन्यात आटोपलेली भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत राहिली होती.ओव्हलच्या मैदानावर झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या या विजयात संपूर्ण संघासह मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने मोठी भूमिका बजावली. पण यादरम्यान इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने सर्वांचं लक्ष वेधलं.खांद्याला फ्रॅक्चर असतानाही तो एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता.
ओव्हल कसोटीदरम्यान ख्रिस वोक्सने दाखवलेल्या जिद्दीचं सर्वांनी कौतुक केलं होतं.ख्रिस वोक्सचा डावा खांदा निखळलेला असतानाही तो वेदनेसह संघासाठी फलंदाजीला उतरला होता. विकेट्सदरम्यान धावत असतानाही त्याला प्रचंड वेदना होत होत्या, पण तरीही तो खेळला.
भारताच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना ५७व्या षटकात त्याला दुखापत झाली. वोक्स सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना त्याने चेंडू चौकारासाठी जाण्यापासून वाचण्यासाठी डाईव्ह लगावली आणि तो सीमारेषेपलीकडे गेला. मैदानावरच त्याने आपला खांदा पकडला आणि वेदनेने विव्हळत तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो गोलंदाजीला देखील उतरला नाही.
वोक्सने खांदा निखळला असतानाही भारताविरूद्ध कशी फलंदाजी केली?
एका वृत्तपत्राशी बोलताना वोक्सने त्या आठवणींना उजाळा दिला होता. “खांद्याला जेव्हा दुखापत झाली, तेव्हा डोक्यात पटकन विचार आला; माझं करियर तर संपलं नाही ना? पण सामन्यादरम्यान मी फलंदाजीला उतरणार की नाही, हा प्रश्नच नव्हता. सामना जसा अधिक अटीतटीचा होत आला, तेव्हा प्रश्न हाच होता की मी एकाहाताने खेळणार कसा आहे?”
वोक्स पुढे म्हणाला, “मैदानावर उतरण्याचा निर्णय कधीच बदलला नाही. संघासाठी मैदानावर उतरून खेळणं हे माझे कर्तव्य आहे, फक्त संघासाठी नाही तर आमच्यासह उभ्या राहिलेल्या सर्वांसाठी. माझ्या खांद्याला किती दुखापत झाली आहे याच्यापेक्षा, त्यावेळी मला फक्त संघासाठी खेळायचे होतं, हे माहित होतं,” असं वोक्स पुढे म्हणाला.
“मनात अनेक विचार सुरू होते. मला आशा होती की गस एटकिन्सन दुसऱ्या टोकाला असताना आम्ही सामना जिंकू आणि मला चेंडूही खेळावा लागणार नाही. पण दुर्देवाने तसं झालं नाही”, असं वोक्स म्हणाला.
वोक्स फलंदाजीला उतरला होता तेव्हा भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती. त्याचा डावा हात पट्ट्यांनी गुंडाळलेला होता, जो त्याने त्याच्या स्वेटरमध्ये लपवला होता. पण तरीही तो संघासाठी मैदानावर उतरून खेळला होता.